पुणे : कृषी विभागात गेले काही महिने रिक्त असलेली कृषी संचालकांची पदे अखेर राज्य सरकारने भरली आहेत. यात रफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनील बोरकर व साहेबराव दिवेकर यांचा समावेश आहे.
या पदांवर सध्या प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या या सर्वांना पदोन्नती देण्यात आली आहे. कृषी संचालकांच्या पदोन्नतीचा विषय अखेर मार्गी लागल्याने विभागात समाधान व्यक्त होत आहे.
कृषी विभागामध्ये कृषी सहसंचालक पदावर तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना कृषी संचालक पदावर पदोन्नती देण्यात येते. या पदावर अशी अट पूर्ण करणारे अधिकारी नसल्याने बहुतांश पदाचा अतिरिक्त पदभार देऊन काम सुरू होते.
अखेर राज्य सरकारने कृषी सहसंचालक पदावरील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यात रफिक नाईकवाडी, विनयकुमार आवटे, सुनील बोरकर व साहेबराव दिवेकर यांचा समावेश आहे.
कृषी आयुक्तालयातील नाईकवाडी, आवटे आणि बोरकर या तीन अधिकाऱ्यांना कृषी संचालकपदाचा अतिरिक्त असलेला पदभार पदोन्नती मिळाल्यानंतर पुन्हा देण्यात आला आहे.
यामध्ये रफिक नाईकवाडी यांच्याकडे विस्तार व प्रशिक्षण, विनयकुमार आवटे यांच्याकडे प्रक्रिया व नियोजन, आणि सुनील बोरकर यांच्याकडे आत्मा अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे.
तर लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांची पदोन्नतीने अकोला येथील महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणेच्या संचालकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
अधिक वाचा: यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार?