सोलापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिलाची देणी थकवल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ शुगर आणि जय हिंद शुगर या दोन साखर कारखान्यांची यंत्रसामग्री (मशिनरी) महसूल प्रशासनाने अखेर सील केली.
सलग तीन नोटिसा दिल्यानंतरही या कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी अदा केली नाहीत. मागील हंगामात गाळप केलेल्या ऊस बिलाची ३८ कोटी रक्कम गोकुळ शुगर धोत्री आणि जय हिंद शुगर आचेगाव या कारखान्यांनी सात महिने उलटून गेले तरी अदा केली नाही.
ऊस बिलाच्या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केली. साखर आयुक्तांनी या तक्रारींची दखल घेत दोन्ही साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश महसूल प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशानुसार संबंधित साखर कारखान्यांना नोटीस दिली. ऊस उत्पादकांच्या रकमा वेळेत अदा करण्यासाठी कारखानदारासमवेत बैठका घेतल्या. रक्कम देण्यासाठी त्यांना मुदत दिली.
मात्र, दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांच्या रकमा अदा केल्या नाही. त्यामुळे तिसऱ्या नोटिशीनंतर आरआरसी कारवाईची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात आली.
अशी केली कारवाईदक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी गुरुवारी स्वतः दोन्ही कारखान्यांत जाऊन पाहणी केली. कारखान्याची चल मालमत्ता शिल्लक नसल्याने यंत्रसामग्री सील केली. कारवाईनंतर कारखाना व्यवस्थापनाकडे यंत्रसामग्रीच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली.
३१ जुलै थकीत रक्कम देण्याचे आश्वासनयाच महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुळ आणि जय हिंद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापनाची बैठक बोलावली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही कारखान्यांनी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत रक्कम अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. गुरुवारी ही मुदत संपताच प्रशासनाने कारवाईचे पाऊल उचलले.
कारखान्याकडे थकीत असलेल्या रकमेच्या वसुलीसाठी यंत्रसामग्री सील करण्यात आली असून कारखान्याच्या मालकीच्या जमिनीवर बोजा चढवण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे. याबाबत साखर आयुक्तांच्या सल्ल्यानुसार यंत्रसामग्री आणि शेतजमीन यांचे मूल्यांकन करून त्याचा लिलाव काढण्याची प्रक्रिया पार पडेल. - किरण जमदाडे, तहसीलदार, दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?