जालना : नाथनगर येथील योगेश्वरी कृषी सेवा केंद्राचे राहुल शिवाजी आरडे यांनी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून चंबल फर्टिलायझर्स कंपनीच्या नावाने डीएपी कंपनीचे बनावट खत आणून त्याची विक्री केल्याप्रकरणी राहुल आरडेंसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, चंबल फर्टिलायझर्स कंपनीने जिल्हा कृषी विभागास मेल करून बाजारात विक्री होत असलेले खत आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे बनावट खत नेमके आले कुठून याचा शोधणे हे जिल्हा कृषी विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बनावट खताची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा कृषी विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी महादेव काटे यांनी गुरुवारी १६ रोजी घनसांवगी तालुक्यातील नाथनगर योगेश्वरी कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यासाठी पोहोचले खरे, मात्र संबंधित कृषी सेवा केंद्रचालक राहुल शिवाजी आरडे किंवा त्यांचा प्रतिनिधी गोदाम उघडून दाखवण्यासाठी आला नाही.
त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिस प्रशासनाची मदत घ्यावी लागली. पोलिसांच्या मदतीने या कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता. चंबल फर्टिलाइझर्स केमिकल कंपनीचे नाव असलेल्या डीएपी खताच्या ६५ बॅग आढळून आल्या होत्या. आढळून आलेल्या ६५ बनावट खतांच्या बॅग ज्याची किमत ७५ हजार ६०० रुपये इतकी होती, त्याचा पोलिसांसमक्ष पंचनामा करण्यात आला आहे.
कृषी सेवा केंद्रचालक राहुल आरडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील इतर दोघांविरोधात शेतकऱ्यांना बनावट खते विक्री केल्याप्रकरणी घनसांवगी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
जालना जिल्ह्यात बोगस खत विक्रीमुळे कृषी विभागदेखील खडबडून जागे झाला असून, विभागाकडून तालुकानिहाय प्रत्येकी एक व जिल्हा पातळीवर एक अशा एकूण ९ भरारी पथकांची नेमणूक केली आहे.
त्यांच्या मार्फत जिल्ह्यातील संशयित कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती घेण्यात येणार आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर ?
बनावट खत विक्री करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा कुणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कृषी विभागाकडून झाडाझडती घेणार का?
• खतांचे दर शासनाने डीएपी अतिशय अल्प ठेवलेले आहेत; परंतु शेतकऱ्यांना डीएपी खताची एक - दोन गोण्या हव्या असल्यास त्यांना कृषी सेवा केंद्रावर खत दिले जात नाही.
• पेरणी आणि पीक बहारात आल्यानंतर शेतकऱ्यांना पिकांना खत टाकावे लागते. याचाच फायदा घेत यापूर्वीदेखील जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांना बनावट बियाणे व खतांची विक्री झालेली आहे.
• बोगस खते आणि बियाणे विक्री थांबविण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून नऊ पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती कशी घेतली जाणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.
घनसांवगी तालुक्यात एका कृषी सेवा केंद्रावर बनावट खतांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी महादेव काटे, कार्यालयीन अधीक्षक संजय कायंदे व इतर अधिकारी यांनी संबंधित दुकानावर छापा टाकून त्यांच्याकडून बनावट खत ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. जिल्ह्यातील बनावट खत विक्री रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात नऊ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील काळात कृषी सेवा केंद्रावर सूक्ष्म नजर ठेवण्यात येणार आहे. - जी. आर. कापसे, जिल्हा कृषी अधिकारी, जालना.
हेही वाचा : बनावट पीकविमा प्रकरणी तपासणी सुरू; आतापर्यंत ७२५ ठिकाणच्या बोगस फळबागा उघडकीस