Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणार; आता राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना, काय आहे नेमका उद्देश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:02 IST

Farmer Suicide Maharashtra राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी समन्वयित, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे.

पुणे: राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक व आर्थिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवली जाणार आहे.

यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

टास्क फोर्समार्फत शेतकरी आत्महत्यांची आर्थिक, सामाजिक व मानसिक कारणमीमांसा, हवामान बदलांचे परिणाम, अल्पकालीन व दीर्घकालीन धोरणात्मक उपाय, तसेच एकात्मिक हस्तक्षेप मॉडेल विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येतील, अशी अपेक्षा आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष विस्तार प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी संचालक आहेत.

तसेच संचालक सुनील बोरकर, उदय देशमुख, सहसंचालक गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे, सोनाली शिळकर हे शासकीय सदस्य आहेत.

तर सृष्टी डोईजड या अशासकीय सदस्य व कृषी धोरणातील तज्ज्ञ संशोधक डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी समन्वयित, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे.

टास्क फोर्सचा नेमका उद्देश काय?◼️ शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन, हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचविणे.◼️ शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपयोजना, शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य.◼️ सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मिक पद्धती विकसित करणे.◼️ आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती विभागीय आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे, विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे.

शेतकऱ्याला कशा पद्धतीने अधिक सक्षम करता येईल, यादृष्टीनेही या विषयाकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागातील सर्व योजना, उपक्रम यांची समन्वय इतर विभागांशी घालून अधिकाधिक प्रभावी पद्धतीने उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढीसाठीही प्रयत्न करणे शक्य व्हावे म्हणून हा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. - सूरज मांढरे, आयुक्त, कृषी

टास्कफोर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून प्रभावी मॉडेल उभे करता येईल, तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांना गती मिळेल. - डॉ. विनायक हेगाणा, सदस्य, टास्क फोर्स

अधिक वाचा: कारखानदारांच्या ऊस काटामारीला चाप; आता कारखाना कार्यक्षेत्रात बसणार शासकीय वजनकाटा

टॅग्स :शेतकरी आत्महत्याशेतकरीमहाराष्ट्रराज्य सरकारसरकारशेतीहवामान अंदाज