कोपरगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे.
शेतकऱ्यांच्या उसाचे वजन ज्या-त्या कारखान्याच्या वजन काट्यावर केली जाते, ही सक्ती रद्द करण्यात यावी, उसाचे वजन खासगी काट्यावर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा डमाळे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
डमाळे पुढे म्हणाले की, काही शेतकरी उसाने भरलेल्या गाडीचे वजन खासगी काट्यावर करण्याचा प्रयत्न करतात मात्र, ड्रायव्हर किंवा स्लीप बॉय कारखान्याच्या शेतकी ऑफिसला कळवतात.
त्यानंतर संबंधित शेतकऱ्याला अक्षरशः वाळीत टाकले जाते, त्याचा पुढील ऊस लवकर तोडणे नाही, किंवा इतर खोडी केल्या जातात. ऊस उत्पादक शेतकरी अथवा सभासद यांची ऊस नोंदणी दरवर्षी केली जाते.
मात्र, शेतकऱ्यांना करार वाचून दाखवला जात नाही. फक्त सह्या घेतल्या जातात. शेतकऱ्यांना कोणत्याही खासगी काट्यावर स्वखर्चाने ऊस वजन करू देण्याचे स्वातंत्र्य व मुभा मिळाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पारदर्शकता येईल.
कोपरगावसह येवला, सिन्नर, निफाड, वैजापूर या भागातून संजीवनी व कोळपेवाडीला ऊस जातो. इतर कारखान्यापेक्षा संजीवनी, कोळपेवाडी उसाला कमी भाव देतात.
त्यांचे उपपदार्थ निर्मितीचे अनेक उपक्रम असून त्याचा हिशेब शेतकऱ्यांना दिला जात नाही. नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, असेही डमाळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यांची चौकशी करा
केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटा मारणाऱ्या कारखान्यांची चौकशी केली करावी, अशी मागणी बाबा डमाळे यांनी केली आहे.
अधिक वाचा: पूरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या पॅकेजचा जीआर आला; कोणत्या घटकाला किती मदत? वाचा सविस्तर