Join us

शेतकऱ्यांची धावपळ थांबणार आता सातबारा लगेच मिळणार; सांगली जिल्हाधिकाऱ्यांची नवी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 16:29 IST

Satbara Nirnay शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या सातबारा उताऱ्यावरील नाव नोंदणी आणि फेरफार प्रक्रियेला आता नवा वेग आला आहे.

सांगली: शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या सातबारा उताऱ्यावरील नाव नोंदणी आणि फेरफार प्रक्रियेला आता नवा वेग आला आहे.

महसूल विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातबारा आणि फेरफार जलद नोंदणीत सांगली जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे कामगिरी शक्य झाली.

पूर्वी अनोंदणीकृत फेरफार (वारस नोंदी) निकाली काढण्यासाठी सरासरी १९१ दिवस लागत होते. आता ही प्रक्रिया अवघ्या ८८ दिवसांत पूर्ण होत आहे, म्हणजेच १०३ दिवसांची बचत झाली आहे.

तसेच, नोंदणीकृत खरेदी दस्तांवरील हरकतींमुळे फेरफार निकाली काढण्यास लागणारा १६४ दिवसांचा कालावधी आता ९२ दिवसांवर आला आहे.

अनोंदणीकृत फेरफार निकाली काढण्यासाठी २५ ऐवजी २२ दिवस, तर नोंदणीकृत दस्तांवरील फेरफार ३४ ऐवजी २८ दिवसांत पूर्ण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत जिल्ह्यातील ही कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा उपाययोजना भविष्यातही सुरू राहतील.

फेरफार प्रक्रियेचा कालावधी कमी झाल्याने सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी जलद होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या यशस्वी मोहिमेमुळे महसूल विभागाची प्रतिमा उंचावली असून, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ झाला आहे.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांचे आणि महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा उपाययोजना भविष्यातही सुरू राहतील, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी काकडे यांनी व्यक्त केली आहे.

फेरफार नोंदणीत राज्यात जिल्हा अव्वल◼️ जिल्ह्यात महसूल विभागाने फेरफार नोंदींच्या मंजुरीच्या कालावधीत सुधारणा केली आहे.◼️ अपर मुख्य सचिव (महसूल) आणि विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या बैठकीतील सूचनांनुसार, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी विशेष प्रयत्न केले.◼️ यामुळे एप्रिल व मे २०२५ मध्ये अनोंदणीकृत नोंदींच्या मंजुरीचा कालावधी ७५ दिवसांनी, तर नोंदणीकृत नोंदींचा कालावधी ४७ दिवसांनी कमी झाला आहे.◼️ जिल्हा फेरफार नोंदींच्या मंजुरीत आघाडीवर आहे. यापुढेही कार्यक्षमता वाढवण्याचा निश्चय अशोक काकडेंनी व्यक्त केला.

अधिक वाचा: Pik Pahani : तुमची ई-पीक पाहणी करायची राहिलीय? काळजी करू नका; आली 'ही' नवीन तारीख

टॅग्स :शेतकरीशेतीमहसूल विभागजिल्हाधिकारीसांगलीमुख्यमंत्रीतहसीलदार