जळगाव जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे, त्यांनी ३१ मार्चच्या आत फक्त मुद्दल भरावी, व्याज भरू नये.
वेळेत कर्ज भरणाऱ्यांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दहा टक्के वाढीव कर्ज दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख उपस्थित होते.
जिल्हा बँकेने २०२४-२५ या वर्षात दोन लाख शेतकऱ्यांना १०५२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यांपैकी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या १ लाख ५९ शेतकऱ्यांना ७१४ कोटी तर बँकेने ४१ हजार शेतकऱ्यांना थेट २३८ रुपये कोटी कर्ज वाटप केले आहे.
एकूण वाटप कर्जाची ४० टक्के वसुली झालेली आहे. विकासोच्या मार्फत कर्ज वाटप झालेल्या ८७ हजार शेतकऱ्यांकडे ४७७कोटी रुपये कर्ज थकीत आहे. त्यांना शून्य टक्के व्याजमाफी मिळणार नाही.
दरम्यान, २५ हजार शेतकऱ्यांचे आधार कार्ड व अन्य बाबी लिंक नसल्याने त्याचे ८ कोटी रुपये केंद्राकडून मिळालेले नाही, त्यामुळे नाईलाजाने ही रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करावी लागत असल्याचे संजय पवार म्हणाले.
या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपडेट केली की, त्याचा पाठपुरावा केंद्राकडे करू व जशी ही रक्कम मिळेल तशी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२५ हजार शेतकऱ्यांकडून ८ कोटी वसूल करणार
• तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज लागू आहे. त्यापैकी ३ टक्के राज्य सरकार तर ३ टक्के केंद्र सरकार यांच्याकडून व्याजाची रक्कम बँकेला मिळते, त्यामुळे बँक शेतकऱ्यांकडून व्याजाची आकारणी करीत नाही.
• शून्य टक्क्याने कर्ज वाटप करते. सलग दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे १२० कोटी रुपये व्याजाचे बँकेचे घेणे आहे, त्यापैकी आता ५८ कोटी रुपये बँकेला प्राप्त झाले. अजून ६२ कोटी रुपये केंद्राकडे घेणे आहे. राज्य सरकारची पूर्ण रक्कम मिळाली आहे.