गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून थकल्याने खरीप हंगामात शेतकरी अडचणीत आले आहे. हा मुद्दा आ. राजकुमार बडोले यांनी विधिमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी (दि.२) उपस्थित केला.
आ. राजकुमार बडोले यांनी सांगितले, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, धान खरेदीची प्रक्रिया अर्ध्यावरच थांबविण्यात आल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान शिल्लक राहिले आहे. यामुळे धान खराब होण्याची शक्यता आहे, तसेच धान विक्री न झाल्यास आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागेल.
त्यामुळे त्यांनी सरकारकडे धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे धान विक्री न झाल्यास त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे सरकारने तातडीने धान खरेदीची मर्यादा वाढवून खरेदी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आमदार बडोले यांनी केली.
आदिवासी विकास महामंडळाने यावर्षी खरेदी केलेल्या धानाच्या चुकाऱ्यांबाबतही गंभीर मुद्दा उपस्थित केला. महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही.
ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी पैशांची गरज असते. मात्र, थकीत चुकाऱ्यांमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढला आहे. सरकारने त्वरित धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण
आ. बडोले यांनी केलेल्या मागण्यांवर सरकारकडून तातडीने कारवाई होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देणे तसेच बोनस आणि चुकाऱ्यांची रक्कम त्वरित देण्यासंदर्भात शासन काय पावले उचलते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.