सांगली : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानासाठी नऊ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सर्वसाधारण सभेत केली.
या तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देणारी शेती करता येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. थकबाकीदार शेतकरी, सभासद आणि संस्थांना पुन्हा ओटीएस (एकरकमी परतफेड योजना) यावेळी जाहीर करण्यात आली.
जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी बँकेचे सर्व संचालक आदी उपस्थित होते.
नाईक म्हणाले, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. शेती उत्पादन वाढविण्यासाठी जगभर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
एआय तंत्रज्ञानासाठी २५ हजार रुपये खर्च असून, त्यापैकी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ९ हजार २५० रुपये, साखर कारखान्यांकडून सहा हजार ७५० रुपये अनुदान दिले जाते. ९ हजार रुपये जिल्हा बँक अनुदान म्हणून देणार आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना ऊस पीक, पाणी, खते, रोगांच्या प्रादुर्भावाबाबत माहिती मिळणार आहे. शेती कर्जासह थकबाकीतून बाहेर पडण्यासाठी ओटीएस पुन्हा सुरू केली आहे. याची मुदत मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे.
अशी होणार मदत◼️ सॅटेलाईट मॅपिंगमुळे शेतातील मातीत असलेली अन्नद्रव्ये, ओलावा, वाफसा, तापमान, पिकांना पाण्याची गरज, पाण्याचे बाष्पीभवन याची अचूक माहिती मिळते.◼️ पिकांवर रोग व किडींच्या प्रादुर्भावाची सुरुवात होताच त्याचीही सूचना दिली जाते.◼️ तंत्रज्ञानाने पाण्याचा किमान ४० टक्के व खतांचा ३० टक्के वापर कमी होऊन पीक उत्पादनात ४० टक्के वाढ होऊ शकते.
तंत्रज्ञानाचा कसा होतो वापर?◼️ ऊस शेतीमध्ये सॅटेलाईट इमेज कॉम्प्युटर व्हिजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग आणि ग्राउंड डेटा इमेजिंगचा वापर करण्यात येतो.◼️ या माध्यमातून उसाचा साखर उतारा ठरविणे, हायपर स्पेक्ट्रल इमेज तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा व पावसाचा अचूक अंदाज बांधता येतो.◼️ ऊस शेतीमध्ये जगामधील पहिल्या मशीन लर्निंगचा वापर करून ३० टक्क्यापर्यंत ऊस उत्पादन वाढविले जात आहे.
अधिक वाचा: Kadvanchi Ranbhaji : पावसावर येणाऱ्या कडवंची रानभाजीला मोठी मागणी; कसे होतात आरोग्याला फायदे?