ओमप्रकाश देवकर
पारंपरिक शेतीला फाटा देत मेहकर तालुक्यातील शेतकरी संत्रा उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. विशेषतः डोणगाव महसूल मंडळ हा संत्रा उत्पादनात आघाडीवर आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील शेतकरी संजय प्रल्हाद आखाडे यांनी १७ एकर क्षेत्रावर रंगपुरी संत्र्याची लागवड केली आहे. या वर्षी १० एकरांवरील १६०० झाडांपैकी ६०० झाडांना बहार आला असून, ९०० रुपये प्रति कॅरेट दराने संत्र्याची विक्री सुरू आहे.
बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांच्या शेतातील संत्रा दिल्ली, बंगळुरू, कोईम्बतूर या मोठ्या शहरांमध्ये पाठवला जात आहे.
आतापर्यंत २५०० कॅरेट संत्र्यांची विक्री झाली असून, व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी वाढली आहे. दरम्यान, मेहकर तालुक्यात अलीकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. कृषी विभागाच्या योजनांतर्गत ठिबक सिंचन संच आणि फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.
त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे अलीकडे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू यांसारख्या पारंपरिक पिकांचे उत्पादन घटत आहे. तसेच, शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे. फळबाग लागवड अधिक फायदेशीर ठरत आहे.
मेहकर तालुक्यातील संत्रा लागवडीचा विस्तार (हेक्टर)
२०२२-२३ | ३४८.०५ |
२०२३-२४ | ५१२.३५ |
२०२४-२५ | १७६.४० |
डोणगाव महसूल मंडळात संत्रा लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कृषी विभागाच्या योजनांतर्गत शेतकऱ्यांना संत्रा आणि इतर फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. ठिबक सिंचन संच अनुदानाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी पुढाकार घेतल्यास, त्यांना अनुदान उपलब्ध होईल. - बी. जी. बोर्डे, कृषी पर्यवेक्षक, डोणगाव.
संत्रा शेतीकडे वाढता कल
संत्रा उत्पादन हे शाश्वत शेतीचा एक भाग बनत असून, यातून शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या तुलनेत अधिक नफा मिळत आहे. तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळे आवश्यकतेनुसार मार्गदर्शन दिले जात आहे.
१०३६ हेक्टरवर तीन वर्षांत फळबाग लागवड
मेहकर तालुक्यात फळबाग लागवडीचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने संत्रा पिकाकडे शेतकरी वळले असून अनुदानाने दिलासा मिळत आहे.
भी बी. एससी. बी. एड. शिक्षण घेतले असले, तरी संपूर्ण वेळ शेतीत घालवत आहे. संत्रा बागेसाठी माझे संपूर्ण कुटुंब मेहनत घेत आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून शेतीला पूरक उत्पन्न वाढवावे. - संजय आखाडे, संत्रा उत्पादक, डोणगाव.