केशव पवार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील धामोरी बु, येथील शिवारात महावितरणच्या गलथान कारभारामुळे भीषण घटना घडली. वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे रविवारी दुपारी ऊस पिकाला आग लागून तीन शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धामोरी बु, शिवारातील गट क्र. ७५ मधील शेतकरी अतुल कल्याणराव शेळके तसेच गट क्र. ७३ मधील शेतकरी हरिभाऊ शेळके व काकासाहेब शेळके यांच्या शेतातील ऊस पिकाला रविवारी दुपारी सुमारे २:३० वाजेच्या सुमारास आग लागली. महावितरणच्या लटकणाऱ्या व जीर्ण झालेल्या तारांमधील वीज शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.
आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने तिन्ही शेतकऱ्यांचा सुमारे ६ एकर ऊस पूर्णतः जळून खाक झाला. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटना घडूनही अद्याप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
तात्काळ पंचनामा करून संपूर्ण नुकसानभरपाई महावितरणकडून देण्यात यावी, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर राहुल ढोले, अतुल शेळके, काकासाहेब शेळके, हरिभाऊ शेळके, रामभाऊ शेळके, विठ्ठल टेके, गणेश शेळके, बाळासाहेब शेळके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ही आग कोणत्याही नैसर्गिक कारणामुळे लागली नसून महावितरणकडून वेळेवर दुरुस्ती न करण्यात आलेल्या धोकादायक वीज तारांमुळेच लागल्याचा आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वीच धामोरी बु, परिसरातील जीर्ण व धोकादायक वीज पोल व तारांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी लेखी मागणी शेतकरी कृती समितीने महावितरणकडे केली होती. मात्र, या निवेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
