Join us

ऊस गळीतास गेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देणे अपेक्षित; आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:34 IST

साखर कारखान्यांनी ऊस गळीतास नेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांन पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत.

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६ हजार ३६४ टन उसाचे गाळप करून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.

पण, २०२३-२४ च्या गळीत हंगामाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये १८ लाख ९५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील कारखान्यांच्या सरासरी साखर उताऱ्यातही ०.६६ टक्के घट झाली आहे.

दरम्यान, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही गेल्या दीड महिन्यापासून उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी २०२३-२४ च्या गळीत हंगामामध्ये ८८ लाख ८३ हजार २४५ टन उसाचे गाळप करून १ कोटी ४१ हजार ८८६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते.

साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के होता. २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्येही १७ साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते. पण, उसाची उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याचा कारखान्यांच्या गाळपावर परिणाम झाला आहे.

सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ७७ लाख ६६ हजार ३६४ टन उसाचे गाळप झाले असून ८१ लाख ४६ हजार ५४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

५०० कोटी रुपये बिलांची रक्कमसाखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले आहेत. तरीही बहुतांशी कारखान्यांनी १ फेब्रवारी ते २५ मार्चपर्यंत गाळपास गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिली नाहीत. ही रक्कम ४०० ते ५०० कोटींहून जास्त असण्याची शक्यता आहे.

साखर उतारा घटीचा परिणाम एफआरपीवरगतवर्षीच्या तुलनेत जवळपास १८ लाख २५ हजार ३४६ क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये साखरेचा सरासरी उतारा ११.१२ टक्के असून यामध्ये ०.६६ टक्क्यांनी घट होऊन २०२४-२५ च्या गळीत हंगामात १०.४६ टक्के राहिला आहे. साखर उतारा घटल्यामुळे त्यांचा परिणाम एफआरपी निश्चित करण्यावर होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

साखर कारखान्यांनी ऊस गळीतास नेल्यापासून १४ दिवसांत शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. पण, कारखान्यांचे गळीत हंगाम संपले तरीही शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून पैसेच दिले नाहीत. शेतकऱ्यांची कर्ज थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा आणखी वाढणार आहे. यास साखर कारखानदार जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. - संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

साखर कारखान्यांनी १४ दिवसांत उसाची बिले देणे बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांना १ फेब्रुवारीपासून बिले मिळाली नाहीत. बहुतांशी कारखान्यांनी महिना ते दीड महिना शेतकऱ्यांची बिले थकीत ठेवली आहेत. म्हणून साखर आयुक्तांकडे शेतकऱ्यांची उसाची बिले थकीत ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना व्याजासह बिले मिळावीत अशी मागणी करणार आहे. - सुनील फराटे

अधिक वाचा: खरीप २०२५ हंगामासाठी खतांच्या संरक्षित साठ्याला मान्यता; कोणत्या खताचा किती साठा?

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीकाढणीस्वाभिमानी शेतकरी संघटनासांगली