Join us

शेतकऱ्याच्या कन्येला व्हायचं होतं शिक्षिका पण झाली आशियातली पहिली महिला रेल्वेचालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 08:24 IST

भारतीय रेल्वेतील ३६ वर्षाच्या सेवेनंतर नुकत्याच त्या निवृत्त झाल्या. 'लोको पायलट' म्हणून मालगाडीवर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

बायकांनी ठरवलं तर त्या काय काय करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुरेखा यादव. सुरेखा यादव या आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट म्हणजे रेल्वेचालक.

भारतीय रेल्वेतील ३६ वर्षाच्या सेवेनंतर नुकत्याच त्या निवृत्त झाल्या. 'लोको पायलट' म्हणून मालगाडीवर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

त्यानंतर भारतीय रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक वंदे भारत ट्रेनच्या लोको पायलट म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांचा हा प्रवास कुण्याही महिलेला प्रेरणा देईल असाच आहे.

२ सप्टेंबर १९६५ रोजी सातारा जिल्ह्यातल्या एका शेतकरी कुटुंबात सुरेखा यांचा जन्म झाला. पाच भावंडांमध्ये सुरेखा सगळ्यात मोठ्या!

कराडच्या शासकीय पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर शिक्षिका व्हायचं असं त्यांनी ठरवलं होतं.

पण त्यांच्या नशिबात मात्र आशियातली पहिली महिला लोको पायलट होण्याचा मानसन्मान लिहिलेला होता. रेल्वे भरतीची जाहिरात नजरेस पडताच त्यांनी अर्ज करायचं ठरवलं. परीक्षा दिल्या आणि त्यांची निवडही झाली.

Loco Pilot Surekha Yadav त्यानंतर साहायक चालक म्हणून त्यांचं प्रशिक्षण सुरू झालं. १९८८ मध्ये आशियातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून कामाला सुरुवात केली.

सुरेखा यादव म्हणतात, 'आयुष्यात काही करायचं असेल तर त्यासाठी ठाम निर्धार हवा. धैर्य हवं. हे तुम्हाला कुणी देत नाही. शिकवत नाही. ते तुमच्यात उपजतच असावं लागतं. ते असेल तर तुम्हाला प्रोत्साहन द्यायला अनेक जण उभे राहातात.

मालगाडीपासून ते 'वंदे भारत' पर्यंत अनेक रेल्वेगाड्या मी चालवल्या. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक या घाटमाथ्यावरच्या मार्गावर अनेकदा माझी ड्यूटी असे.

हे घाटरस्ते पार करताना प्रचंड एकाग्रता लागते; पण ते आम्हाला प्रशिक्षणात शिकवलेले असते. माझ्या यशात माझ्या कुटुंबीयांचा आणि भारतीय रेल्वेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले.

अधिक वाचा: 'एफआरपी' एकरकमीच द्यावी लागणार; राज्य शासनाची 'ती' मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

टॅग्स :रेल्वेशेतीशेतकरीकराडमहाराष्ट्रवंदे भारत एक्सप्रेसवैमानिकशिक्षक