गोंदिया जिल्ह्यात युरिया खताचा पुरवठा नियमित होत असल्याचे कृषी विकास अधिकारी सांगत आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर युरियाच उपलब्ध नसल्याची बोंब आहे.
परिणामी याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यात युरियाचा पुरवठा केला जात असला तरी हंगामाच्या सुरुवातीलाच युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने युरिया नेमका कुठे जात आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात खरिपात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाणार आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. रोवणी दरम्यान युरिया खताची अधिक मागणी असते. तीच बाब लक्षात घेऊन कृषी केंद्र संचालकसुद्धा युरियाचा अधिक स्टॉक करून ठेवतात. बुधवारी (दि.२) जिल्ह्यासाठी युरियाची रॅक लागली.
एनएफएल कंपनीचा जवळपास १ हजार मेट्रिक टन युरिया जिल्ह्यासाठी आला. यानंतर या युरियाचे नियोजन करून जिल्ह्यातील वितरकांना वितरण करण्यात आले. मात्र गुरुवारी (दि.३) दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक वितरक आणि कृषी केंद्राकडे युरियाचा स्टॉक नसल्याची ओरड सुरू झाली.
कृषी केंद्रावर युरिया घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना युरिया न मिळाल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागले. त्यामुळे जिल्ह्याला युरियाचा पुरवठा केला जात आहे तर मग टंचाई कशी निर्माण होत आहे आणि पुरवठा केलेला युरिया नेमका कुठे जात आहे, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
युरियाचा स्टॉक किती उपलब्ध कळेना !
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांच्यावर खताचे नियोजन करून त्याचे वितरण करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहे. तसेच ते भरारी पथकाचे प्रमुख आहेत. मात्र सद्यःस्थितीत जिल्ह्यात युरियाचा किती स्टॉक उपलब्ध आहे ही माहितीच त्यांच्याकडे उपलब्धनाही. त्यांना विचारणा केली असता माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले जाते.
आजपासून पडताळणी मोहीम राबविणार
जिल्ह्यातील खत वितरक, कृषी केंद्र संचालक यांना किती मेट्रिक टन युरिया वितरित करण्यात आला. यापैकी त्यांनी किती युरियाची विक्री केली. सद्यःस्थितीत त्यांच्याकडे किती युरियाचा स्टॉक उपलब्ध आहे तसेच ऑनलाइन स्टॉकनुसार युरियाचा साठा उपलब्ध आहे किंवा नाही याची पडताळणी शुक्रवारपासून (दि.४) मोहीम राबवून करण्यात येईल असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील खत मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये
गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच गोंदिया जिल्ह्यातील युरिया खताची मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे विक्री केली जात असल्याची माहिती आहे. यात एका वितरकाची भूमिका महत्त्वपूर्ण असून याची तक्रारसुद्धा करण्यात आल्याची माहिती आहे.
युरियाच्या तुटवड्याच्या वाढल्या तक्रारी
शेतकरीच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक किरकोळ कृषी केंद्रांना युरिया खताचा पुरवठा केला जात नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात त्यांनी कृषी विभागाकडेसुद्धा तक्रारी केल्या आहेत. याला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनीही दुजोरा दिला.