Join us

बाजार समितीचे दुर्लक्ष अन् कांद्याच्या थकीत पैशांसाठी शेतकरी चढले जलकुंभावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:17 IST

Vaijapur Market Yard : वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल ४०६ शेतकऱ्यांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

बाबासाहेब धुमाळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल ४०६ शेतकऱ्यांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

यासाठी सदर शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र बाजार समिती प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने गुरुवारी सकाळी १० वाजता या संतप्त शेतकऱ्यांनी जलकुंभावर चढून आंदोलन केले.

कांदा व्यापारी सागर राजपूत याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बाजार समितीने ४५ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळले नाही.

आपल्या स्तरावर निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे पत्र पणन मंडळाने बाजार समितीला दिले आहे; परंतु बाजार समिती काहीही निर्णय घेत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी परिसरातील जलकुंभावर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

यामुळे खळबळ उडली. परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासनाने अग्निशमन दलासह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवली असून, आंदोलक शेतकऱ्यांची रात्री उशिरापर्यंत मनधरणी सुरू होती.

हेही वाचा : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना 'अशी' घ्या काळजी; अबाधित आरोग्यासह टळेल आर्थिक हानी

टॅग्स :मार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकांदाशेती क्षेत्रबाजारशेतकरीवैजापूरछत्रपती संभाजीनगर