कोल्हापूर : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत.
प्रतीक्षा यादी बदलून पंप आधी बसवून देतो, असे आश्वासन देणारे काही बनावट कॉल शेतकऱ्यांना येत असल्याची तक्रार प्राप्त झाल्या आहेत.
शेतकऱ्यांनी अशा बनावट कॉल किंवा मेसेजला बळी पडू नये, अशा कॉलनुसार कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
या योजनेत ज्या क्रमाने नोंदणी केली आहे त्यानुसार पंप बसविण्यात येतो. कोणालाही प्रतीक्षा यादी बदलून व इतरांना डावलून पंप देण्यात येत नाहीत.
शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आपल्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर पंप बसविण्यासाठी नंतर कधीही पैसे भरण्याची गरज नाही. हिश्श्याची रक्कम भरून पंप बसविणाऱ्या एजन्सीची निवड केली की त्या शेतकऱ्याचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट होते.
या योजनेत शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व सौर कृषी पंप असा संपूर्ण संच मिळतो. केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते.
अनुसूचित जातीजमातीच्या शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. सौर कृषी पंप बसविण्याच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
बनावट कॉल आले, तर शेतकऱ्यांनी महावितरणच्या १८०० २३३ ३४३५ अथवा १८०० २१२ ३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्यातही होते लूटशेतात सौर कृषी पंप बसविताना काही ठिकाणी संबंधित एजन्सीकडून शेतकऱ्यांकडे वाहतूक खर्च अथवा अन्य साहित्याची मागणी झाल्याच्याही तक्रारी महावितरणकडे आल्या आहेत. परंतु, सौर कृषी पंप बसविण्याबाबत संपूर्ण कामाची जबाबदारी संबंधित एजन्सीची असल्याने शेतकऱ्यांनी अशा प्रकारे साहित्याची मागणी झाल्यास त्याची दखल घेऊ नये व महावितरणकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: दस्त नोंदणी झाली सोपी; आता तुमच्या जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीचा दस्त