जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच मसाला पीक म्हणून ओव्याची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. जळगाव तालुक्यातील भादली बु, भोलाणे, कडगाव, शेळगाव यासह अन्य परिसरातील शेतकऱ्यांनी ओवा लागवडीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने क्षेत्रविस्तार आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत होत आहे. 'आत्मा' यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांना ओवा लागवडीकरिता आवश्यक प्रशिक्षण आणि सर्व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या मार्गदर्शनामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात नवीन पिकांच्या लागवडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. या माध्यमातून एकट्या जळगाव तालुक्यात ५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ओव्याची लागवड झाली आहे, तर संपूर्ण जिल्ह्यात हे क्षेत्र १०० हेक्टरपर्यंत वाढले आहे.
ओवा लागवडीचे असे आहेत फायदे
• उत्पादन खर्च कमी.
• एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन.
• बाजारात चांगला आणि शाश्वत भाव.
• खरीप हंगामातील पिकांनंतर लागवडीची सोय.
कमी खर्च, चांगले उत्पन्न
भादली बु. येथील शेतकरी योगेश झांबरे यांनी या लागवडीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओव्याची लागवड करतो. या पिकास फवारणी आणि रासायनिक खत कमी प्रमाणात लागते, ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. यातून चांगले उत्पन्न मिळत असून बाजारात भावही चांगला मिळत आहे. एकरी ५ ते ६ क्विंटल इतके उत्पादन अपेक्षित आहे.
नावीन्यपूर्ण पिकाकडे शेतकऱ्यांची वाटचाल
• कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण पिकांचे प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे.
• शेतकरी आता खरीप हंगामात उडीद, मूग पिकांचे उत्पादन घेतल्यानंतर, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ओवा पिकाची लागवड करतात.
• उत्पादन खर्च कमी असताना बाजारात या पिकास चांगला भाव मिळत असल्याने, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी ओवा लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी दिली.
