Join us

शेतकऱ्यांना लागली फळबागेची गोडी; वर्षाला ४ टक्के फळबागांच्या क्षेत्रामध्ये होतेय वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 10:13 IST

Orchard Farming : कोणी स्ट्रॉबेरी, सफरचंद तर कोणी अवाकेंडो तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केशर आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षभरात पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे.

अशोक डोंबाळे 

सांगली जिल्ह्यात कोणी स्ट्रॉबेरी, सफरचंद तर कोणी अवाकेंडो तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केशर आंबा, केळी, द्राक्ष, डाळिंब, पेरू लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षभरात पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे. वर्षाला ४ टक्के फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. आता फळपिकांचे क्षेत्र ५८ हजार हेक्टरांवर पोहोचले आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ, वाकुर्डे अशा मोठ्या उपसा सिंचन योजनांमुळे जिल्ह्यात वरचेवर कोरडवाहू क्षेत्राचे सिंचनखालील क्षेत्रात रूपांतर झपाट्याने वाढत आहे. चार पैसे हमखास मिळणारे पीक म्हणून उसाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. याशिवाय जिल्ह्यात कारखान्यांची संख्या अधिक असल्याने ऊस गाळपासाठी अडचणी येत नाहीत.

जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असले तरी इतर फळपिकांनाही तेवढेच महत्त्व शेतकरी देत आहेत. भाजीपाला पिकाला खात्रीशीर बाजारपेठ नसल्यामुळे शेतकरी फळपिकांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात फळपिकांचे क्षेत्र ५७ हजार हेक्टरपर्यंत आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, पेरु आर्दीचा समावेश आहे.

याशिवाय शेतकरी प्रयोगशील असल्यामुळे कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी, तर शिराळा, तासगाव, आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सफरचंद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

फळबाग सर्वाधिक क्षेत्र जत, तासगावमध्ये

फळबाग लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र जत तालुक्यात ११ हजार ७९९ हेक्टर तर तासगाव तालुक्यात १० हजार १४७ आणि मिरज तालुक्यात नऊ हजार ६४४ हेक्टर क्षेत्र आहे. सर्वात कमी फळबागा शिराळा, कडेगाव तालुक्यात हजार हेक्टरच्या आतच असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

वर्षाला ५५ हजार टन फळांची निर्यात

जिल्ह्यातून द्राक्ष, डाळींब, पेरू, केळींसह आदी फळांची सरासरी ५५ हजार टनापर्यंत निर्यात होत आहे. दरही चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी फळ पिकाकडे वळत आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फळबागांचे क्षेत्र

फळपीकक्षेत्र हेक्टर
द्राक्षे३६७९१
डाळींब१४४९२
आंबा३४२१
चिकू४३२
पेरू६३१
केळी७८५
पपई२०७
सिताफळ५२४
अॅपलबोर६४
नारळ१०३
लिंबू१६९
चिंच८२
आवळा२९
ड्रॅगनफुट२१०
सफरचंद६.६०
फणस४.६०
स्ट्रॉबेरी३.४५

४% पर्यंत वार्षिक फळपिकांच्या क्षेत्रात वाढ

रब्बी, खरीप आणि उन्हाळी अशा तीन हंगामामध्ये जिल्ह्यात फिक घेतली जात आहेत. सांगली जिल्ह्याचे हवामान बहुपिक पध्दतीला अनुकूल असल्यामुळे वेगवेगळ्या पीक पद्धती येत आहेत. टेंभू, ताकारी, म्हैसाळ आणि आरफळ, वाकुर्डे अशा उपसा सिंचन योजना झाल्यामुळे शेतकरी पारंपरिक पीक पद्धत बदलून फळपीक लागवडीचे विविध प्रयोग करताना दिसत आहे. जिल्ह्यात वार्षिक ४ टक्क्यांपर्यंत वाढत आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

प्रतापूरच्या शेतकऱ्याकडून अवाकॅडोची लागण

अवाकॅडो है एक उष्णकटिबंधीय फळ आहे, ज्याला अनेकदा 'बटर फ्रूट' किंवा 'अॅलिगेटर पेअर', असेही म्हणतात. ते एक निरोगी फळ आहे, ज्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे, खनिजे चांगली आहेत. या फळाची जत तालुक्यातील प्रतापूर येथील अझुरीद्दन शेख या शेतकऱ्यांनी लागण केली आहे.

हेही वाचा : ढेगे पिंपळगावच्या शेतात पिवळ्या टरबूजचा यशस्वी प्रयोग; ओमरावांनी घेतले ४० गुंठयात दोन लाख चाळीस हजारांचे उत्पन्न

टॅग्स :फलोत्पादनशेतकरीशेतीशेती क्षेत्रसांगलीकृषी योजनाफळे