जळगाव जिल्ह्याच्या कजगाव, पिंप्री, भोरटेक (ता. पाचोरा) शिवारात बिबट्याची दहशत, तर भोरटेक (ता. भडगाव) शिवारात रानडुकरांचा मुक्त संचार.. या दहशतीमुळे बळीराजा कमालीचा वैतागला आहे.
बिबट्या पिकांना पाणी भरू देत नाही, तर रानडुकरं पिकं घेऊ देईना, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसह शेतमजूरही वैतागले आहेत.
आठ-पंधरा दिवसांपासून बिबट्याने कजगाव, पिंप्री, भोरटेक (पाचोरा) या शिवारात आपला मुक्काम ठोकला आहे. दररोज शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांसह शेतमजूर हिंमत करत नाहीत. कारण या भागात बिबट्याचा वावर वाढला असून, शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे.
काही पिके काढणीवर आली आहेत, तर काही पिकांना शेवटच्या पाण्याची गरज आहे. मात्र, बिबट्याच्या दहशतीमुळे घबराट आहे. भोरटेक (ता. भडगाव) शिवारात रानडुकरांसह अन्य वन्यप्राण्यांनी पिकांची नासाडी सुरू केली आहे. भोरटेक शिवारातील शेतकरी वन्यप्राण्यांचा उपद्रवामुळे हताश झाला आहे.
पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरूच
वन्यप्राण्यांचा जास्त करून उपद्रव सुरु आहे. वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जागता पहारा सुरू केला आहे. रोजच्या उपद्रवाला शेतकरी वैतागत आहेत.
या प्राण्यांची दहशत
रात्रभर फटाक्यांचा आवाज, इलेक्ट्रॉनिक स्पीकरवर कुत्रा भुंकण्याचा आवाज यासह विविध उपाययोजना करत पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करत आहेत. या भागात हरीण, नीलगाय, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचे कळप रात्री बिनधास्त शेतशिवारात संचार करत पिकांचे नुकसान करत आहेत.
हेही वाचा : शेणखताला दर्जेदार कुजविण्यासाठी गांडूळ निवडायचे आहेत? मग 'या' गोष्टी विसरू नका बरं