Join us

शेतकऱ्यांच्या सल्लागारांना कंपनीकडून मिळते २० टक्के मलई; कशी पाहूया सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:05 IST

शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या गळ्यात भरमसाठ महागडी औषध मारायचा फंडा 'पीजीआर' कंपन्यांनी गेल्या आठ, दहा वर्षांत सुरू केला आहे.

दत्ता पाटीलतासगाव : शेतकऱ्यांना जादा उत्पन्नाचे आमिष दाखवायचे. त्यांच्या गळ्यात भरमसाठ महागडी औषध मारायचा फंडा 'पीजीआर' कंपन्यांनी गेल्या आठ, दहा वर्षांत सुरू केला आहे.

कंपन्यांच्या कुरणातील मलई खाण्यासाठी सल्लागारांचा सुळसुळाट झाला. सल्लागारांना केवळ शेतकऱ्यांना औषधे सुचविण्यासाठी १५ ते २० टक्के कमिशन दिले जाते.

इतकेच नव्हे, तर महागड्या गाड्यांपासून बारबालांपर्यंत सरबराई देखील केली जाते. त्यातूनच गरज नसताना पीक संजीवके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अतिरेकी वापर वाढला. परिणामी शेतकऱ्यांवरील आर्थिक खर्चाचा बोजा वाढला.

द्राक्षबागाच नव्हे, तर सर्वच फळबागा आणि भाजीपाला पीक उत्पादकांना या भ्रष्ट साखळीने बळी बनविले आहे. तासगावसारख्या द्राक्षाचे आगर असणाऱ्या भागात अनेक शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष अनुभवातून शेतीचा पॅटर्न तयार केला.

अनेक नवीन वाणांचे संशोधन केले. त्यातूनच स्वतःच्या अनुभवाचे गाठोडे नवीन शेतकऱ्यांसाठी खुले केले. ही परंपरा पीजीआर कंपन्यांच्या बाजारामुळे मोडीत निघाली.

या कंपन्यांनी सल्लागारांनाच कमिशनचे आमिष दाखविले त्यातून सल्लागारांचे पीक फोफावले. त्यांना बागायतदारांच्या नफा-तोट्याशी देणे- घेणे नाही, तीन-चार वर्षे सल्ला दिल्यानंतर पुन्हा नवीन शेतकऱ्यांना बकरा बनवण्याचे धोरण चालू आहे.

विजापूर ते नाशिकपर्यंत सल्लागारांचे जाळे- कर्नाटकात विजापूर आणि परिसरात द्राक्षाचे क्षेत्र नव्याने वाढत आहे. नाशिकपर्यंत सल्लागारांचे मोठे जाळे विणले गेले आहे.- यांना कंपन्यांकडून कमिशनशिवाय पाचगणी, महाबळेश्वर, गोवासह परदेश वाऱ्या घडवून, बारबालांपासून पार्थ्यांचे आयोजन केले जाते.- पाचगणी येथे ज्यादिवशी पोलिसांचा छापा पडला त्याचदिवशी सांगली जिल्ह्यातील दुसऱ्या कंपनीने गोवा येथे काही सल्लागारांना खूश केले होते.- सहा महिन्यांपूर्वी मुंबईतील हॉटेलमध्ये कंपनीने खूश केले होते, तर सोलापूर येथील कंपनीने महाबळेश्वरमध्ये असेच कारनामे केले होते.

सल्लागारांचे कारनामे१) सांगली जिल्ह्यात सुमारे १५० द्राक्ष सल्लागार आहेत. त्यापैकी २५-३० वर्षांपासून काम करणारे केवळ १५ ते २० जण आहेत. प्रत्येक सल्लागार शेतकऱ्याकडून सरासरी दहा हजार रुपये एक एकर क्षेत्रासाठी घेतो.२) जत तालुक्यातील एका सल्लागाराने स्वतःचे ब्रेण्डिंग करून स्वतःची फी प्रती एकर २० हजार रुपये ठेवली आहे. ही फी अॅडव्हान्स घेतली जाते. त्याचे सल्ले घेणाऱ्या दाक्ष उत्पादकांचा खर्च अन्य बागायतदारंपेक्षा दीडपट जास्त आहे. मात्र मिळणारे उत्पन्न तितकेच आहे.३) तासगाव तालुक्यातील एका सल्लागाराने वर्षभरापूर्वी काही कंपन्यांना संपर्क साधून अॅडव्हान्स म्हणून दहा लाख रुपये घेतले होते. या सल्लागाराची स्वतःची एक गुंठादेखील बाग नाही.४) नाशिक जिल्ह्यातील एका पीजीआर कंपनीने सांगली जिल्ह्यात स्वतःचे बस्तान बसवण्यासाठी २८ सल्लागारांना वीस लाख अॅडव्हान्स दिली होती.

अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या घामावर 'पीजीआर' कंपन्यांची कोटींची उलाढाल; शंभर रुपये उत्पादन खर्चाचे औषध हजार रुपयांना

टॅग्स :द्राक्षेशेतकरीशेतीखतेफलोत्पादनफळेनाशिकसांगली