प्रताप महाडिक
कडेगाव : खेराडे (ता. कडेगाव) येथील शेतकरी विनायक आनंदराव साळुंखे यांनी विक्रमी ऊस उत्पादनाचा आदर्श निर्माण केला आहे.
साळुंखे यांनी चालू हंगामात एकरी १३८ टन ऊस उत्पादन घेऊन त्यांचाच एकरी १३० टन उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला.
विनायक साळुंखे यांनी मागील वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ८६०३२ जातीच्या ऊस रोपांची लागण केली. ठिबक सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले.
खर्च एकरी एक लाख रुपये केला. या उसाला तब्बल ५० कांडी आहे. या उसाची मागील चार दिवसांत तोडणी केली आणि त्यातून एकत्रित १३८ टन ऊस उत्पादन मिळवले.
या ऊसशेतीतून त्यांनी तीन लाखांहून अधिक नफा मिळविला. साळुंखे यांनी प्रयोग आणि कष्टातून मिळवलेले यश इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम आणि संचालक शांताराम कदम यांच्यासह सर्व संचालक मंडळाने साळुंखे यांचे अभिनंदन केले.
विनायक साळुंखे यांनी केलेला विक्रम इतर ऊस उत्पादकांसाठी एक दिशादर्शक ठरणारा आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रयोगशीलतेमुळे संपूर्ण ऊसशेती क्षेत्राला एक नवा दृष्टिकोन मिळाला आहे. इतर ऊस उत्पादकांनीही त्यांची प्रेरणा घ्यावी. - शांताराम कदम, संचालक सोनहिरा साखर कारखाना
अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर