Farmer Success Story : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गायवळ या गावात राहणारे शेतकरी रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली आहे.
सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पारंपरिक पिकातून फारसा नफा न मिळाल्याने त्यांनी लिंबू (lemons) लागवडीचा प्रयोग केला अन् तो यशस्वी ठरला.
कडक उन्हामुळे लिंबाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लिंबाचे (lemons) दरही वाढले आहेत. लिंबू सरबत, लिंबू पाणी, आणि इतर थंड पेयांमध्ये लिंबाचा वापर केला जाते, ज्यामुळे उन्हाळ्यात लिंबाची मागणी अधिक असते.
हीच बाब लक्षात घेऊन, गायवळ (ता. कारंजा) येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad) यांनी अवघ्या सव्वामहिन्यात लिंबू (lemons) विक्रीतून तब्बल दीड लाख रुपयांची कमाई केली आहे. यंदा बाजारात दरही चांगले होते त्यामुळे लिंबाची (lemons) लागवड त्यांना फायद्याची ठरली.
रवींद्र गायकवाड यांनी यंदा अर्धा एकर क्षेत्रावर लिंबू लागवड केली होती. योग्य अंतरावर लागवड, ठिबक सिंचन प्रणालीचा वापर, सेंद्रिय खते आणि वेळच्यावेळी केलेले कीडनियंत्रण या सगळ्यांमुळे उत्पादन दर्जेदार मिळाले. एप्रिल ते मेच्या मध्यावर त्यांच्या बागेतील लिंबाला बाजारात चांगला दर मिळाला. सरासरी प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्री करत त्यांनी केवळ सव्वामहिन्यात दीड लाख रुपये उत्पन्न मिळवले.
गायकवाड यांनी यापूर्वी सोयाबीन, हरभरा यासारख्या पारंपरिक पिकांवर भर दिला होता. मात्र, बाजारातील बदलती गरज ओळखून त्यांनी लिंबू लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. गायकवाड यांच्या यशामुळे परिसरातील इतर शेतकरीदेखील हळूहळू हंगामी फळपिकांकडे वळत असल्याचे दिसत आहे.
प्रेरणादायी पाऊल
रवींद्र गायकवाड यांना मिळालेले यश बघून परिसरातील इतर शेतकरी देखील हंगामी फळपिकांकडे वळू लागले आहेत. कमी खर्च, योग्य नियोजन आणि बाजारपेठेची अचूक ओळख या त्रिसूत्रीवर त्यांनी यशाचा मार्ग शोधला आहे.
लिंबूची मागणी, दर दोन्ही स्थिर
'उन्हाळ्यात लिंबूची मागणी आणि दर दोन्ही स्थिर' असतात. मेहनत घेतल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील गरज ओळखूनच पीक लागवड केली पाहिजे. -रवींद्र गायकवाड, शेतकरी, वाशिम