Join us
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावमधून हापूसची ऑस्ट्रेलिया, मलेशियामध्ये निर्यात; ३२० मेट्रिक टन आंब्याची विकिरण प्रक्रिया पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:15 IST

Mango Export : लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्र, कृषक विकिरण केंद्राने आंबा निर्यातीमध्ये यंदा बाजी मारली आहे. या हंगामात आतापर्यंत ३२० मेट्रिक टन आंब्याची विकिरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामधून अमेरिकेला ३०९ मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला ६ मेट्रिक टन आणि मलेशियाला ३ मेट्रिक टन आंबा पाठवण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्र, कृषक विकिरण केंद्राने आंबा निर्यातीमध्ये यंदा बाजी मारली आहे. मागील वर्षी परवानगी वेळेत न मिळाल्याने येथून निर्यात झाली नव्हती. यंदा मात्र येथील केंद्रात विकिरण प्रक्रिया केल्यानंतर ऑस्ट्रेलिया न्यूयॉर्क, आणि मलेशियालाही चवदार हापूस आंब्याची वेट निर्यात करण्यात आली आहे.

या हंगामात आतापर्यंत ३२० मेट्रिक टन आंब्याची विकिरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामधून अमेरिकेला ३०९ मेट्रिक टन, ऑस्ट्रेलियाला ६ मेट्रिक टन आणि मलेशियाला ३ मेट्रिक टन आंबा पाठवण्यात आला आहे. सुमारे ८८ हजार बॉक्समधील हापूस केशर आंब्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याची निर्यात करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली.

या केंद्रात २००२ ते २००६ दरम्यान केवळ कांद्याचे विकिरण होत होते. मात्र २००७ पासून आंब्यावरही प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला अणुसंशोधन केंद्र आणि पणन मंडळाच्या ताब्यात असलेला हा प्रकल्प सध्या हिंदुस्थान ॲग्रो लिमिटेड या खासगी कंपनीकडून चालवला जात आहे. मागील वर्षी आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्याने निर्यात थांबली होती.

आणखी देशांकडे निर्यातीसाठी सज्ज

• लासलगाव केंद्रातून पुढील काही दिवसांत दक्षिण कोरिया आणि मलेशिया व इतर देशांना निर्यात होणार आहे.

• भारतातून दरवर्षी सुमारे ५० हजार टन आंबा निर्यात होतो, ज्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. यंदा ३१ जूनपर्यंत सुमारे ३ हजार टनांची निर्यात होण्याचा अंदाज असल्याचे सांगितले..

• हापूस, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, लंगडा, चौसा अशा विविध जातींना परदेशात मोठी मागणी आहे. त्यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचे आयुष्य वाढविले जाते.

लासलगाव येथून झालेली आंबा निर्यात (टनात)

वर्ष निर्यातवर्ष निर्यात
२००७१५६ २०१६ ५६० 
२००८२७५ २०१७ ६०० 
२००९ १२२ २०१८ ५८० 
२०१० ९६ २०१९ ६८५ 
२०११ ८५ २०२० निर्यात नाही
२०१२ २१० २०२१ निर्यात नाही
२०१३ २७५ २०२२ ३६० 
२०१४ ३२८ २०२३ १,००० 
२०१५ ३२८ २०२४१,१०० 

युद्धामुळे आंबा निर्यातीमध्ये तीन पटीने वाढ झालेली आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन फ्रेट दर कसे कमी राहतील आणि निर्यातीला कसे प्रोत्साहन मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - प्रकाश खाखर, के. बी. एक्सपोर्ट.

गॅमा विकिरणामुळे वाढते टिकाऊपण

कोकणातील हापूस आणि गुजरातमधील केशर आंबा लासलगाव येथे आणून गॅमा किरणांच्या साहाय्याने विकिरण प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे आंबा अधिक काळ ताजा राहतो, कोयीतील कीड नष्ट होते, आंब्याची चव आणि गुणवत्ता कायम राहते. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय आंब्यांना मागणी वाढत आहे.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

English
हिंदी सारांश
Web Title : Lasalgaon Mangoes Exported to Australia, Malaysia After Radiation Processing

Web Summary : Lasalgaon's radiation center successfully exported Hapus mangoes to Australia, New York and Malaysia after processing 320 metric tons. The center, now run privately, also plans exports to South Korea and other countries. Gamma radiation extends shelf life, boosting international demand.
टॅग्स :आंबाशेतकरीशेतीशेती क्षेत्रनाशिकफळे