सोलापूर : पाऊस नसल्याने पेरणी करता आली नाही, पिकांच्या वाढीला प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान आर्दीमुळे मागील आठ वर्षांत राज्यात पीकविमा कंपनीकडून १६,५९० कोटी (एकूण मिळालेल्या रकमेच्या ५१ टक्के) रुपये मंजूर झाले आहेत.
पीकविमा नुकसानभरपाईचे हे सर्व निकष राज्य शासनाने यंदा रद्द केल्याने यावर्षी शेतकऱ्यांना या निकषावर नुकसानभरपाई मिळणार नाही. मात्र, पीक कापणी उत्पादन आधारित नुकसानभरपाई मिळणार आहे.
मागील आठ वर्षांचा विचार केला असता पीक कापणी उत्पादनावर जेवढी नुकसानभरपाई मिळाली आहे त्यापेक्षा अधिक पैसे शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व इतर बाबीमुळे मिळाली आहे.
पीक कापणी उत्पादनावर आठ वर्षांत १५ हजार ९४० कोटी म्हणजे पीकविमा नुकसानभरपाई मिळालेल्या एकूण रकमेच्या ४९ टक्के, तर पेरणी न करता, मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीत, स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसानीपोटी आठ वर्षांत १६ हजार ५९० कोटी म्हणजे ५१ टक्के रक्कम पीकविमा कंपनीकडून मिळाली आहे.
यावर्षी केवळ पीक कापणी उत्पन्नावर विमा कंपनी नुकसानभरपाई देणार असल्याने इतर घटकांतून नुकसानभरपाई मिळणार नाही.
आठ वर्षांत खरीप व रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना ३२ हजार ५३५ कोटी रुपये नुकसानभरपाई विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान
◼️ २०१८ पासून खरीप व रब्बी हंगामातील (२०२४ चा रब्बी हंगाम वगळता) पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीकडून १३७८ कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहेत. त्यापैकी ८२ कोटी रुपये या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे सांगण्यात आले.
◼️ मंजूर १३७८ कोटींपैकी पीक कापणी उत्पन्नावर आधारित ५६६ कोटी, तर पेरणी करता न येणे, पिकांच्या वाढीला प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान या बाबींतून ८१२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
◼️ आता नव्या निकषात या बाबी वगळल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
अधिक वाचा: ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास मुदतवाढ; यंदा किती कोटींची तरतूद? वाचा सविस्तर