Join us

कोल्हापूर जिल्ह्यातील हा कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 10:56 IST

राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत.

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य शासनाने यंदा १५ नोव्हेंबरनंतर राज्यातील साखर कारखान्यांना हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली; मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील 'दालमिया' कारखाना वगळता सर्वच कारखान्यांच्या चिमण्या अद्याप थंडच आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुतांशी कारखानदारांनी बॉयलर पेटवून ठेवले असले तरी त्यांच्या गव्हाणी अद्याप उसाच्या मोळीच्या प्रतीक्षेतच आहेत. नेते प्रचाराच्या फडात रंगल्याने ऊस मात्र शिवारात तसाच उभा आहे.

मागील हंगामात शेतकरी संघटनेच्या ताणलेल्या आंदोलनामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साखर कारखाने सुरू झाले होते. यंदा, 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेने प्रतिटन ३४०० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे.

संघटनेचे नेतेही निवडणुकीच्या फडात गुंग असल्याने आंदोलनाची धग यावर्षी किती पेट घेणार? हे पाहावे लागेल, राज्य शासनाने १७ नोव्हेंबरनंतर हंगाम सुरू करण्याची परवानगी दिली आहे; पण 'दालमिया' वगळता इतर कारखाने अद्याप थंड आहेत.

बुधवारी (दि. २०) मतदान झाल्यानंतर मोळी पूजन करून कारखाने सुरू करण्याची मानसिकता दिसते. मतदान करूनच ऊसतोड मजूर येणार असल्याने गुरुवारी (दि. २१) बहुतांशी मजूर कार्यस्थळावर येणार आहेत. एकंदरीत विधानसभेच्या निकालानंतर हंगाम गती घेणार आहे.

गुऱ्हाळघरे जोरातसाखर हंगाम लांबल्याने गुहाळघरे यंदा जोमात आहेत. नोव्हेंबर संपत आला तरी अद्याप कारखाने सुरू नाहीत, त्यामुळे खोडवा उसाचे गाळप होण्यास फेब्रुवारी, मार्च उजाडणार आहे. तो ऊस गुहाळघराला पाठवून तिथे दूसरे पीक घेण्याच्या मानसिकतेत शेतकरी आहेत. त्यात गुळालाही चांगला भाव आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीरकोल्हापूर जिल्ह्यातील पशुधन आणि वैरणीचे क्षेत्र पाहिले तर पिकांवरच शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. मे ते ऑगस्टपर्यंत उसाचा पाला, ऑगस्ट ते ऑक्टोबर ओले गवत त्यानंतर उसाच्या वाड्याचा चारा म्हणून वापर केला जातो. डोंगरमाथ्यावरील गवत संपले आहे, त्यात साखर कारखाने सुरू नसल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

हंगामावर पावसाचे सावटनोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर जरी हंगाम सुरू झाला तरी त्यावर पावसाचे सावट राहणार आहे.

अधिक वाचा: केळी पिकामध्ये फुल बाहेर पडण्याच्या व घड काढणीच्या वेळेनुसार कसे कराल लागवडीचे नियोजन

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीकोल्हापूरनिवडणूक 2024स्वाभिमानी शेतकरी संघटनासरकार