कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ३७ कर्मचाऱ्यांना सातवा आयोग लागू करण्याबाबतचा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवला आहे. यावरून, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असून वेतन आयोग लागूच करायचा तर उर्वरित कर्मचाऱ्यांनाही लागू करा, अशी मागणी होत आहे.
बाजार समितीच्या सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांपैकी ९० कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार आहे. उर्वरित ६२ कर्मचारी हे सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे काम करत आहेत.
त्यामुळे, या ६२ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी गेली वर्षभर सुरू आहे. पण, बाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता, आतापर्यंत हा विषय लांबणीवर टाकला होता. आता, त्या ६२ पैकी ३७ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला असून संचालक मंडळाच्या गुरुवारी (दि. २८) होणाऱ्या सभेत मंजुरीसाठी ठेवला आहे.
यावरून २५ कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वेतन आयोग सर्वच कर्मचाऱ्यांना द्या, अन्यथा आणखी सहा महिने थांबवा, असे काही संचालकांचे म्हणणे आहे. यावरून सभेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय मंजुरीसाठी ठेवला आहे. चार संचालक जीआय मानांकनाच्या कामानिमित्त चेन्नईला आहेत. - तानाजी दळवी (सचिव, बाजार समिती).
चार संचालक चेन्नईत
गुळाच्या जीआय मानांकनाबाबत माहिती घेण्यासाठी बाजार समितीचे चार संचालक चेन्नईच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याची चर्चा सुरू आहे.