गुलाबी थंडीचा गारवा अखेरच्या दिवसात असताना कधी ढगाळ वातावरण, तर कधी उन्हाचे चटके अशा निसर्गाच्या बदलात जंगल परिसरात झाडांना पानगळ सुरू झाल्याने वसंत ऋतूची चाहूल लागल्याचे चिन्ह दर्शवत आहेत.
अशा बदलत्या ऋतूत ठिकठिकाणी पळसाची फुले आपल्या सौंदर्याचा रंग उधळताना दिसतात. हिरव्यागार झाडीतून गर्द केशरी रंगाची ही टोकदार फुले नजरेला आकर्षित करून मनाला आल्हाददायक अनुभूती देत आहेत.
हिरव्यागार झाडीतून दिसणारी ही फुले जंगलाचे सौंदर्य फुलवतात. पळस फुले ही केवळ आकर्षण व सुंदर दिसणारी नसून आयुर्वेदातही त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे.
प्राचीन काळापासून शास्त्रामध्ये पळसाला औषधी वनस्पती म्हणून महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे पळसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
औषधी वनस्पतीचा मान
मोखाडा तालुक्यातील विविध जंगलपट्टयात केशरी रंगाचे फुल देणारा पळस वर्षभर हिरवागार असतो; पण वसंत ऋतू येताच त्याची पानगळ होऊन झाडाला फक्त फुलांचे गुच्छ दिसतात.
मूतखड्यावर बहुउपयोगी
◼️ पळसाची केशरी फुले सुकवून त्याचे चूर्ण बनवून मूतखडाबाधित व्यक्तीला दिल्यास खडा विरघळून त्याचे पाणी होते.
◼️ लघवीस येणारी जळजळ थांबते.
◼️ शेंगांच्या बियाची पावडर बनवून मूळव्याध, रक्तदाब, हृदयविकार, पचनक्रिया, किडनी आजारावर रामबाण उपयोगी ठरते.
◼️ पळसाच्या पानाचे द्रोण बनवून ते खाद्यपदार्थ खाण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे पळस हा पर्यावरणपूरक मानला जातो.
पळसाचे इतर उपयोग
◼️ पळसाच्या पानापासून पर्यावर पर्यावरणपूरक पत्रावळ्या बनवल्या जातात. आदिवासींना यातून मोठा रोजगार मिळतो.
◼️ पावसापासून बचावासाठी जंगलात झोपडी बनवताना या झोपडीवर पानांचे आच्छाद घातले जाते.
◼️ या पानांमध्ये थंडावा असल्यामुळे रानमेवा पानांमध्ये बांधून आणल्यास दीर्घकाळ टिकतो.
◼️ पोळा सणावेळी आदिवासी या झाडांची मुळे ठेचून त्याचा गोंडा बनवून आपल्या आवडत्या बैलाच्या गळ्यात बांधतात व घराच्या प्रवेशद्वारावर त्याचे तोरण करून बांधतात.
अधिक वाचा: शासनाने बिगरशेती एनए परवानगी देण्याचे कलेक्टरचे अधिकार काढले; आता कोण देणार परवानगी?
