आरोग्याबाबत वाढती जागरूकता, वाढती जीवनशैली-आधारित आजार आणि मधुमेहाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोक आता दैनंदिन आहारातील साखर कमी करण्याकडे झुकत आहेत.
त्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरण्याकडे बऱ्याच जणांचा कल वाढला आहे. गूळ 'नैसर्गिक' असल्याने तो अधिक सुरक्षित किंवा आरोग्यदायी समजला जातो. मात्र साखरेऐवजी गूळ उत्तम आरोग्यासाठी खरंच फायद्याचा आहे का? जाणून घेऊया सविस्तर...
साखर आणि गुळातील फरक काय?
• साखर आणि गूळ हे दोन्हीही उसापासून तयार होतात, परंतु त्यांची प्रक्रिया वेगवेगळी असते. साखर पूर्णपणे परिष्कृत असल्यामुळे तिच्यातील सर्व नैसर्गिक घटक जवळपास नष्ट होतात.
• गूळ मात्र नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो. त्यामुळे त्यामध्ये काही प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे टिकून राहतात. साखर पांढरी, स्फटिकासारखी असते. तर गूळ रंगाने कणखर व गडद असतो.
• मात्र दोन्हींचा मुख्य घटक सुक्रोजच असल्यामुळे दोन्ही गोड पदार्थ शरीराला जवळपास समान प्रमाणात ऊर्जा देतात.
रक्तातील साखरेवर परिणाम
• ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर किती वेगाने वाढते याचे मोजमाप. साखरेचा जीआय साधारण ६५ ते ७० च्या दरम्यान असतो. गुळाचाही जीआय जवळजवळ तेवढाच म्हणजे ६० ते ७० पर्यंत असतो.
• त्यामुळे गुळ खाल्ल्यावर रक्तातील साखर जवळजवळ साखरे इतकीच वाढते. ही गोष्ट विशेषतः मधुमेहींसाठी धोकादायक आहे. गूळ नैसर्गिक आहे म्हणून रक्तातील साखर वाढत नाही, असा समज वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा आहे.
गूळ खाण्याचे फायदे
• गूळ पचनास मदत करतो, विशेषतः जेवणानंतर तो खाल्ल्यास पोट हलके वाटते, असे अनेकांना जाणवते. गुळामध्ये असलेली लहान प्रमाणातील खनिजे हिवाळ्यात शरीराला थोडी उष्णता देण्यास मदत करतात.
• प्रदूषणामुळे श्वसनमार्गात जमा होणाऱ्या कणांचे प्रमाण कमी करण्यास थोडी मदत होऊ शकते, असा दावा काही तज्ज्ञ करतात. गुळाच्या सेवनाने शरीरात तात्पुरते ऊर्जावर्धन होते.
• तथापि, हे फायदे अत्यंत मर्यादित असून, त्यावर आरोग्य टिकवणे किंवा रोगप्रतिबंधकता वाढवणे अवलंबून ठेवणे चुकीचे आहे.
मधुमेहींसाठी साखर आणि गूळ हे दोन्हीही धोकादायक आहेत. कारण दोन्ही पदार्थ रक्तातील साखरेवर तात्काळ आणि मोठा परिणाम करतात. गूळ नैसर्गिक असल्यामुळे मधुमेहींना चालतो, असे अनेकांना वाटते, परंतु, हा एक गैरसमज आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गोड पदार्थापासून शक्य तितके दूर राहणेच योग्य ठरते. - डॉ. रामेश्वर नाईक, तज्ज्ञ, परभणी.
