पुणे : खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणीत यंदा प्रत्येक जिल्ह्यातील ५ गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असलेले स्वमालकीच्या शेती क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे.
त्यामुळे राज्यात खरीप हंगामात लागवडीखालील क्षेत्रात दुरुस्ती होणार आहे, अशी माहिती भूमिअभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
नागरीकरणामुळे जमिनींचे तुकडे होऊन ५ गुंठ्यांखालील क्षेत्राचा वापर रहिवासासाठी केला जात आहे. त्याची नोंद अद्याप शेतीक्षेत्रातच केली जात आहे.
प्रत्यक्षात इतक्या कमी क्षेत्रावर कुठेही लागवड केली जात नाही. त्यामुळे असे क्षेत्र नावावर असलेले जमीनमालक ई-पीक पाहणी करत नाहीत.
भूमिअभिलेख विभागाने या क्षेत्राची जिल्हानिहाय यादी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविली आहे. या यादीची प्रत्यक्ष पडताळणी करून लागवडीखालील क्षेत्रातून हे क्षेत्र वगळण्याचे निर्देश दिले आहेत, असेही दिवसे यांनी सांगितले.
राज्यात ४९, ३६६ सहायकांची नियुक्ती
◼️ शेतकरी स्तरावर पीक पेरा नोंदविल्यानंतर उर्वरित क्षेत्रातील पिकांची नोंद सहायक स्तरावर घेण्यात येते.
◼️ यासाठी राज्यात ४९,३६६ सहायकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
◼️ या सहायकांचे नाव व संपर्क क्रमांक महसूल विभागाच्या 'चावडी' या संकेतस्थळावर प्रसिद्ध आहे.
अधिक वाचा: महाडीबीटी वरील शेतीच्या सर्व योजना दिसणार आता तुमच्या मोबाईलवर; डाउनलोड करा 'हे' मोबाईल अॅप