मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा बु, येथील प्रगतिशील शेतकरी सुनील शंकर भोसले यांनी कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करत दुहेरी पीक(Double Cropping) पद्धतीचा यशस्वी अवलंब केला आहे. त्यांनी संत्रा बागेत (Orange Garden) मल्चिंग पेपरच्या साहाय्याने मिरचीची लागवड (Chillies Cultivation) केली आहे.
त्यांनी संत्रा बागेत मल्चिंग पेपरच्या साहाय्याने मिरचीची लागवड (Chillies Cultivation) केली. हा प्रयोग यशस्वी ठरला असून, सध्या त्यांच्या शेतात मिरचीचे पीक (Chillies Crop) जोमात बहरले आहे.
संत्रा पीक हे शेतकऱ्यांसाठी अनेक वर्षापासून लाभदायक पीक मानले जाते. मात्र, त्याच जमिनीत मिरचीची लागवड करून दोन्ही पिकांचा एकत्रित फायदा कसा मिळवता येईल, हा प्रश्न शेतकरी भोसले यांना पडला.
त्यासाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करून मातीतील आर्द्रता टिकवण्यासोबतच तण वाढ रोखणे आणि मिरचीच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण करणे, या गोष्टी साध्य केल्या.
या प्रयोगाने अनेक शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुहेरी पीक पद्धतीमुळे एकाच जमिनीवर दोन वेगवेगळ्या पिकांमधून अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. दुहेरी पीक पद्धतीचा अवलंब केल्यामुळे यंदा त्यांना १ लाखाच्यावर उत्पन्न होण्याची शक्यता आहे. या नवकल्पनेमुळे स्थानिक कृषी उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर शेतकरीही करतील या पद्धतीचा अवलंब
या प्रयोगाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे इतर शेतकरीही या पद्धतीचा अवलंब करण्यास प्रेरित होऊन या पध्दतीचा अवलंब करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकरी या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी शेतात दाखल होत असल्याची माहिती सुनील शंकर भोसले यांनी दिली.
दुहेरी पीक पद्धत म्हणजे काय?
दुहेरी पीक पद्धत (Double Cropping) म्हणजे एकाच शेतात एका वर्षात दोनदा पीक घेणे, ज्यामुळे जमिनीचा जास्तीत जास्त वापर होतो आणि उत्पादकता वाढते. दोन पिके घेतल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळते.