Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > गहू मळणीनंतर काड पेटविण्याची घाई नको; अति उतावीळपणा असा येऊ शकतो अंगलट

गहू मळणीनंतर काड पेटविण्याची घाई नको; अति उतावीळपणा असा येऊ शकतो अंगलट

Don't be in a hurry to light the fire after threshing wheat; being too hasty can backfire | गहू मळणीनंतर काड पेटविण्याची घाई नको; अति उतावीळपणा असा येऊ शकतो अंगलट

गहू मळणीनंतर काड पेटविण्याची घाई नको; अति उतावीळपणा असा येऊ शकतो अंगलट

गहू मळणीनंतर शेतातील गव्हाचे काड पेटवत असताना बाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या साडेतीन एकर गव्हाला आग लागून तो खाक झाला.

गहू मळणीनंतर शेतातील गव्हाचे काड पेटवत असताना बाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या साडेतीन एकर गव्हाला आग लागून तो खाक झाला.

तरडगाव : फलटण तालुक्यात गहू पिकाची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तरडगाव परिसरात मळणी यंत्र शेतात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

अशातच गहू मळणीनंतर शेतातील गव्हाचे काड पेटवत असताना बाजूच्या इतर शेतकऱ्यांच्या साडेतीन एकर गव्हाला आग लागून तो खाक झाला. यामुळे गहू मळणीनंतर लगेच काड पेटविण्याची घाई नको, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

यंदा गव्हाचे क्षेत्र खूप आहे. बहुतांश गहू काढणीला आल्याने या कामात सर्व शेतकरी व्यस्त आहेत. मळणीसाठी एकरी २,५०० रुपये असा दर आहे.

लवकर पेरणी झालेल्या गहू पिकाची काढणी झाली आहे. अजून बरेचसे क्षेत्र बाकी आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने त्याची भीतीही आहे.

यामुळे लगबग वाढून मळणी यंत्र शेतात आणण्यासाठी प्रत्येकाला कसरत करावी लागत आहे. यासाठी वारंवार संपर्क साधावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी हात-तोंडाला आलेला साडेतीन एकर गहू जळून खाक झाल्याची दुर्घटना घडली होती. आग लागल्याचे समजताच इतर शेतकरी व युवकांनी प्रसंगावधान दाखवित आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

बाजूला मका पीक असल्याने परिसरातील इतर गव्हाचे क्षेत्र सुरक्षित राहिले; अन्यथा मोठ्या प्रमाणात गहू पीक आगीत जळून गेले असते.

या दुर्घटनेत झालेल्या नुकसान भरपाईबाबत संबंधितांनी बैठकीतून तोडगा काढला असला तरी पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले जात आहे.

तसेच ही घटना ताजी असताना त्याच्या दुसऱ्या दिवशी शॉर्टसर्किटमुळे एका शेतकऱ्याच्या पाऊण एकर गव्हाला आग लागून तो जळून खाक झाला. त्याचा पंचनामा करण्यात आला.

उतावीळपणा करू नये
◼️ प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या गहू पिकाची मळणी झाली की, शेतातील काड पेटविण्यासाठी लगेच उतावीळपणा करू नये.
◼️ आपल्या बाजूला असलेल्या इतरांचाही गहू निघाला की नाही, याची दक्षता घेऊनच हवा शांत झाल्यावर शेतातील काड पेटवून देणे सर्वांसाठी सुरक्षित आहे.

काड जाळण्यापेक्षा हे करा
रोटाव्हेटर वापरून काड जमिनीत मिसळणे. त्यामुळे मातीची रचना सुधारते व सूक्ष्मजीवांची वाढ होते.

काड जाळण्याचे तोटे
मातीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात, प्रदूषण वाढते, जमीन सुपीकता कमी होते.

अधिक वाचा: शेतजमिनी अजून महाग होणार; पुढील आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण भागातही रेडीरेकनर दर वाढणार?

Web Title: Don't be in a hurry to light the fire after threshing wheat; being too hasty can backfire