vadhavan port bhusampadan मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदराचा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी निधी देण्याचे जाहीर केले.
मात्र वाढवण येथील शेतकऱ्यांनी २० लाख रुपये गुंठा दर दिल्याशिवाय मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपल्या शेतजमिनी देणार नाहीत अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे वाढवण बंदरासाठीच्या मार्गाला ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर जमून 'एकच जिद्द वाढवण बंदर रद्द' घोषणा देत संताप व्यक्त केला.
वाढवण बंदर प्रकल्पाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची शासनाकडून मोबदला रक्कम जाहीर झाली. मात्र या मोबदल्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत.
वाढवण बंदराला तवा येथे जोडणाऱ्या ३२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग आणि दहा किलोमीटर लोहमार्ग उभारणीसाठी २४ गावांमधील ६८४.२८.१४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे.
डहाणूतील १० गावातील ३६०.७९.३५ हेक्टर जमीन तर पालघर तालुक्यातील १४ गावातील ३२३.४८.७९ हेक्टर जमिनीसाठी शासनाकडून जाहीर केलेला मोबदला हा अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी धडक दिली.
देशाचा विकास मात्र शेतकऱ्यांना भकास करण्याचे षडयंत्र
◼️ योग्य मोबदला न दिल्यास एकाही अधिकाऱ्याला आमच्या जमिनीमध्ये येऊ देणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला.
◼️ तर आतापर्यंत जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहे.
◼️ देशाचा विकास होत असताना शेतकऱ्यांना भकास करण्याचे सरकारचे षडयंत्र असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले.
◼️'शेतकऱ्यांना आश्वासित करून त्यानंतर अत्यल्प दर जाहीर करून शासनाने आमची फसवणूक केल्याने आत्महत्येशिवाय आमच्या पुढे पर्याय उरलेला नाही', असे तणाशीच्या उपसरपंच कोमल चौधरी म्हणाल्या.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो पिक काढणीची कामे उरकून घ्या; राज्यात 'ह्या' तारखेला पुन्हा गारपिटीची शक्यता
