रताळे हे एक पौष्टिक कंदमूळ अहे. उपवासाच्या दिवसात विशेषतः महाशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते.
गोड बटाटा (स्वीटपोटॅटो) म्हणून ओळखले जाणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उपवासाच्या काळात रताळ्याच्या सेवनाने शरीराला ऊर्जा देण्याचे काम होते.
स्टार्चने परिपूर्ण असल्यामुळे रताळ्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. रताळ्यांमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. विशेषतः केशरी रंगाच्या रताळ्यामध्ये 'अ' जीवनसत्त्व जास्त प्रमाणात आढळते.
हे डोळे, त्वचा, हाडे आणि नसा यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. रताळ्यांमध्ये पोटॅशियम असल्याने ते हृदयाच्या कार्यासाठी मदत करते. रताळ्यांमध्ये फॅटस आणि कोलेस्ट्रॉल नाही. ते पचायला हलके असतात.
रताळ्यांचा गर पांढरा, पिवळसर किंवा केशरी रंगाचा असतो. रताळे भाजून, उकडून किंवा त्यापासून एखादा चविष्ट पदार्थ बनवून खाल्ले जाते. गोड आणि तिखट अशा दोन्ही प्रकारांनी ते रुचकर लागते.
रताळ्याच्या केशरी आवरणामध्ये बीटा कॅरोटिन हे अँटिऑक्सिडंट असते. त्यामुळे कॅन्सर तसेच डोळ्यांच्या आजारांचा धोका टळतो. पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते. वजन वाढण्यात अन्नातल्या ऊर्जा (कॅलरीज) चा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचे प्रमाण प्रत्येक १०० ग्रॅम मागे फक्त ८६ एवढे असते.
रताळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. या गुणधर्मामुळे निर्जलीकरण होत नाही. लोह असल्याने हिमोग्लोबिन वाढते. पिष्टमय पदार्थांमुळे शरीरातील अतिरिक्त मेद कमी करण्याचं काम करतो. नवीन मेदावर नियंत्रण आणतो.
रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळी-अवेळी लागणाऱ्या भुकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रताळ खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते.
एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्रॅम फायबर असते. म्हणून उपवासाच्या दिवसाव्यतिरिक्त एरवी रताळ्याचा आहारात समावेश करावा.
कॅन्सरशी लढणारे घटक
◼️ उपवासाव्यतिरिक्त नियमित आहारातही रताळ्यांचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
◼️ रताळ्यांमध्ये कॅन्सरशी लढणारे घटक असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे.
◼️ यातील प्रोटीन इनहिबिटर या प्रथिनांत कॅन्सर पेशींच्या वाढीला थांबविण्याची क्षमता असल्याचं वैज्ञानिकांना आढळले आहे.
◼️ तंतुमय मेद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सावकाश पद्धतीने सुरू राहून लवकर भूक लागत नाही.
◼️ यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?