अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रमाण वाढल्याच्या आरोपावरून शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांना निवेदन सादर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करून या लुटीला त्वरित थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात शेतकरी संघटनेने सांगितले की, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा, कापूस, सोयाबीन, मका, तूर अशा सर्वच प्रमुख शेतीमालांच्या खरेदीत शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या MSP (किमान आधारभूत किंमत) पेक्षा खूप कमी भावात माल खरेदी करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार, MSP पेक्षा कमी भावात शेतीमालाची खरेदी करणे हे गुन्हा आहे यावर सुद्धा लक्ष वेधले आहे. असे असूनही संबंधित बाजार समित्यांचे पदाधिकारी शेतकऱ्यांच्या लुटीत भागीदार झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
विशेषतः नगर जिल्ह्यात कांद्याच्या बाजारभावात मोठा फरक दिसून येत आहे. लासलगाव बाजार समितीचे भाव संदर्भ घेऊन देशभरात कांद्याचा बाजारभाव ठरविला जात असताना नगर जिल्ह्यात कांदा खरेदीला १००० ते १५०० रुपये कमी भाव दिला जात आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे.
शेतकरी संघटनेने हा मुद्दा गंभीर मानून, शेतकऱ्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांचे हक्क व संरक्षण न मिळाल्यास त्रीव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
निवेदनावर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, महिला आघाडीच्या सुनीता वानखेडे, युवा आघाडीचे मयूर भनगडे, प्रकाश जाधव, शीतल पोकळे, कोमल वानखेडे, आशा महांकाळे, मंदा गमे, पुष्पा घोगरे, सुनीता अमोलिक, शीला वानखेडे, मधूकर काकड, अशोक आव्हाड, श्रीराम त्रिवेदी, बापूसाहेब आव्हाड, बाळासाहेब घोगरे, संतोष दातीर, महेश पटारे, योगेश देवकर, जगदीश खरात, रवींद्र पुंड, रमेश शिंगोटे, त्रिंबक भदगले, लालसाहेब सुद्रीक, हरून सय्यद, बाळासाहेब सातव, विष्णू भनगडे, बाबासाहेब गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
