नेवासा/भेंडा: वरखेड (ता. नेवासा) येथील स्वामी समर्थ साखर कारखान्याच्या दोन काट्यांमध्ये वेगवेगळे वजन भरत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर आंदोलन केले.
आतापर्यंत झालेल्या गाळपाचे उसाच्या वजनाच्या १० टक्के फरकाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्यास भरपाई देण्याची मागणी भाजपचे नेते ऋषिकेश शेटे यांनी केली आहे.
२ टनापर्यंत उसाच्या वजनात फरक दिसल्याचा दावा वरखेड शिवारातील स्वामी समर्थ शुगर अँड अॅग्रो लिमिटेड, माळेवाडी या कारखान्याचा दुसरा गळीत हंगाम सुरू आहे. या ठिकाणी दोन वजनकाटे आहेत.
शनिवारी (दि. १७) सकाळी एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टर प्रथम आउटच्या काट्यावर गेला, त्या ठिकाणी वजन केल्यानंतर पुन्हा प्रथेप्रमाणे कारखान्याच्या काट्यावर वजन केले असता, ते कमी भरले.
हा प्रकार सर्व शेतकऱ्यांना समजल्यानंतर त्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांना कळवण्यात आली. शेटे यांनी कारखाना बंद करण्याचा आग्रह धरला.
दोन्ही काट्यावरील वजनात दीड ते दोन टनाचा फरक समोर आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, त्यांनी कारखान्याचे मॅनेजर गाडे यांना जाब विचारला.
ऋषिकेश शेटे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलिस निरीक्षकांना संपर्क साधला. हा प्रकार थेट सोशल मीडियावर प्रसारित केला. भाजपचे अंकुश काळे यांनीही कारखान्याकडे धाव घेत कारखाना प्रशासनाला धारेवर धरले.
आमदार विठ्ठलराव लंघे यांनीही कारखाना कार्यस्थळावर जाऊन पोलिस निरीक्षक महेश पाटील व उपजिल्हाधिकारी रमेश दराडे यांच्याशी चर्चा केली.
दोन्ही काट्यांची तपासणी उपजिल्हाधिकारी रमेश दराडे यांनी केली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
ऋषिकेश शेटे यांनी संताप व्यक्त करीत कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेतल्याचे शेटे यांनी सांगितले.
शेतकरी संघटनेचे आंदोलन
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधिज्ञअजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
नगर जिल्हाध्यक्ष हरिअप्पा तुवर, तालुकाध्यक्ष मेजर अशोक काळे, कायदेशीर सल्लगार अॅड. बाळासाहेब कावळे, किरण लंघे, बाबासाहेब नागोडे, बापूराव देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली.
अधिक वाचा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; नेमका कसा होणार फायदा? वाचा सविस्तर
