नरेंद्र कावळे
हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांची जयंती शाश्वत शेती दिन म्हणून ७ ऑगस्ट रोजी साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. स्वामिनाथन यांच्या संशोधनामुळे गहू, तांदळाचे उत्पादन वाढविणे शक्य झाले. शिवाय सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांना लागवड खर्चात बचत करून विषमुक्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे.
त्यांचा आदर्श बाळगत गोंदिया जिल्ह्याच्या धामणगाव (ता. आमगाव) येथील २५० हून अधिक शेतकरीसेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीतून आर्थिक समृद्ध होणारे गाव म्हणून या गावाची ओळख होवू लागली आहे.
रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, मातीचा होत चाललेला हास, तसेच वाढत्या आरोग्याच्या समस्या पाहता, सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे प्रयत्न अनेक शेतकरी करीत आहेत. अशातच धामणगाव या छोट्याशा गावातील २५० पेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेती करून भरघोस उत्पन्न घेत आहेत.
या गावातील शेतकरी शेतीसोबत पशुपालन सुद्धा करतात त्यामुळे त्यांना शेणखत सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. सेंद्रिय शेतीच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांनी अन्नपूर्णा सेंद्रिय शेती बचत गट तयार करून त्या माध्यमातून दीड कोटी रुपयांवर उलाढाल केली आहे.
सेंद्रिय शेती करता लागणारे शेणखत, शेतीतील अवजारे खरेदीसाठी लागणारी रक्कम या बचत गटामार्फत सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गावातील अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून धान, गहू व भाजीपाला यांचे उत्पन्न घेऊन प्रगतशील शेतकरी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
सेंद्रिय शेती आर्थिक स्थैर्याची गुरुकिल्ली
सेंद्रिय शेती ही केवळ शेतीची नाही तर आरोग्य, पर्यावरण आणि आर्थिक स्थैर्याची देखील गुरुकिल्ली ठरू शकते. योग्य प्रशिक्षण, बाजारपेठ व धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास शेतकरी सेंद्रिय शेतीकडे अधिक प्रमाणात वळू शकतात. तसेच रासायनिक शेतीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि वाढता खर्च टाळण्यास सुद्धा मदत होत आहे.
शेतकऱ्यांची स्वदेशी वाणांची बँक तयार
शहरी भागात सेंद्रिय शेतीत उत्पादित भाजीपाला व धान्याला खूप मागणी आहे. धामणगाव येथील शासन पुरस्कृत शेतकरी संतोष पारधी यांनी धानाच्या २५ प्रकारच्या स्वदेशी प्रजातींची सीड बँक तयार केली आहे. शिवाय ते गावातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे.
मी गेल्या १० वर्षापासून सेंद्रिय शेती करतोय. यामुळे मातीचा कस सुधारला आहे. आधी जमीन नापीक होत होती आता कंपोस्ट, शेणखत वापरून ती अधिक सुपीक झाली आहे. सेंद्रिय शेतीत उत्पादित शेतमालाला बाजारपेठेत सुद्धा चांगला दर मिळतो. पण विक्रीसाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे मला एकरी १५ क्विंटल धानाचे उत्पादन झाले. - सुखदेव गायधने, शेतकरी धामणगाव.
सेंद्रिय शेतीत मेहनत घ्यावी लागते पण समाधानही तितकंच मिळतं. सेंद्रिय शेती करताना पाण्याची आवश्यकता असते. मात्र वीज पुरवठा नियमित होत नसल्याने शेतकरी उत्पादन घेण्यास मागे पडतो. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. - टेकचंद लक्ष्मण टेंभरे, शेतकरी.
सेंद्रिय शेती ही एक शाश्वत, आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. मात्र, या शेती पद्धतीचा स्वीकार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कमी उत्पादन, बाजारपेठ व प्रशिक्षणाचा अभाव आहे. शासनाने या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्यास भविष्यात अधिक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील. - संतोष हिरदीलाल पारधी, प्रगतशील शेतकरी.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी