कोल्हापूर : नवीन खरीप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.
खरीप हंगाम २०२४-२५ साठी जिल्ह्यातील ११ हजार ६०७ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. या हंगामात सततचा पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
लहरी हवामानामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी, यासाठी शासनाने एक रुपयात प्रधानमंत्री राष्ट्रीय पीक विमा योजना सुरू केली.
हंगाम २०२३-२४ खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ हजार ७०४ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी विम्यासाठी २७३२ शेतकरी पात्र ठरले होते. त्यांच्यासाठी ६८ लाख ९४ हजार रक्कम भरपाईपोटी मिळाली.
या खरीप हंगामात मात्र विमा कंपन्यांनी निकषात बदल केल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली. पूर्वी व्यक्तिगत नुकसानीनुसार पंचनामे होऊन भरपाई दिली जायची; पण या खरीप हंगामापासून महसूल मंडळातील नुकसान ग्राह्य मानल्याने शेतकऱ्यांना ते मारक ठरले.
पाऊस एवढा लहरी आहे, एका गावात अतिवृष्टी झाली तर शेजारच्या गावात अजिबातच पाऊस नसतो. इतका लहरीपणा पावसाचा झाला आहे. यामुळे खरीपात विमा उतरणाऱ्या शेतकऱ्यांत्ती संख्या कमी झाली.
खरीप २०२३-२४ मधील पीक विम्यातील सहभाग
◼️ शेतकरी सहभागी संख्या - ८६,७०४
◼️ मिळालेली रक्कम - २,७३२
◼️ भरपाईस पात्र शेतकरी - ६८.९४ लाख
खरीप २०२४-२५ मधील सहभागी शेतकरी
◼️ शेतकरी - ११,६०७
◼️ विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टर) - ३,५०५.९
पीक विम्याच्या पंचनाम्याची प्रक्रिया झाली असून साधारणतः या महिन्याअखेर पात्र शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. - नामदेव परीट (उपसंचालक, कृषी, कोल्हापूर)
अधिक वाचा: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार का? वाचा सविस्तर
