Join us

आंब्याच्या गोडीपुढे केळीची मागणी कमी; तीव्र उष्णतेचा सामना करतांनाच आता दरांत नाही हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 4:21 PM

तापमानाचा केळीला फटका: उष्णतेमुळे घड पडतात काळे

युनुस नदाफ

आठवड्यापूर्वी केळीला दीड ते एक हजार दर मिळू लागला होता; परंतु अचानक दरात मोठी घसरण झाली आहे. आठवडाभरात निम्म्याखाली भाव आल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. जोपर्यंत आंब्याची गोडी कमी होत नाही, तोपर्यंत केळीला गोडी येणार नाही. आंब्यामुळे बाजारपेठेत केळीला मागणी नसल्याने केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

मागील आठवड्यात केळीला १५०० ते १००० प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता आठ दिवसांतच ९०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. अचानकच दरात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. केळीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले आहे. केळीपासून यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना अचानक दरात घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने तिन्ही मंडळांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक उन्नतीचे साधन केळी आहे. यामुळे शेतकरी केळी लागवडीपासून ते केळीचे घड काढणीपर्यंत लाखो रुपये खर्च करतो, मात्र केळीला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

तापमानाने केळीला काळे डाग

■ यंदा केळी लागवडीपासूनच केळीवर अनेक संकटे आली. कधी अतिवृष्टी, तर अती हिवाळा, आता तर तापमानाचा कहर झाला आहे. नांदेडमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, या तापमानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पिकांना होताना दिसत आहे.

■ केळी पिकाला पाणी असले, तरी तापमानामुळे केळीच्या घडाला काळे डाग पडत आहेत. तसेच, केळी वाळत आहे. अनेक संकटांचा सामना करीत मोठ्या हिमतीने केळीची बागा वाचविल्या, परंतु काढणीच्या वेळीच दरात घसरण झाल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

खरेदीदारांचा कल आंब्याकडे

बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, खरेदीदाराचा कल आंब्याकडे असल्याने आणि जळगावच्या केळीची आवक वाढल्याने नांदेडच्या अर्धापूर केळीचे दर घसरले आहे.

उन्हामुळे केळीला फटका तापमानामुळे केळीचे घड गळून पडत आहेत. केळीला कितीही पाणी दिले, तरी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने केळीवर मोठा परिणाम झाला आहे. - अनिल साबळे, शेतकरी पार्डी म.

हेही वाचा - उन्हाळ्यात केळी बागेला कसे' सांभाळाल, वाचा हे सोपे उपाय!

टॅग्स :केळीउष्माघातफळेशेतीशेतकरीपीकमराठवाडाविदर्भ