अरुण बारसकर
सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकबाकीदार शेतकरी कर्जदारांसाठी राबविलेल्या ओटीएस योजनेत मार्च अखेरपर्यंत ७ हजार ३४७ कर्जदारांनी भाग घेतला असून, त्यांनी भरलेल्या २०२ कोटी थकबाकीवर १९ कोटी ६६ लाख इतकी सवलत मिळाली आहे.
स्वतःच्या थकबाकीवर अशा प्रकारची कर्जदारांसाठी व्याज सवलत राबविणारी डीसीसी ही एकमेव बँक आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर २९ मे २०१८ रोजी प्रशासक नियुक्त झाले.
सुरुवातीला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले त्यानंतर शैलेश कोतमिरे यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले.
कोतमिरे यांनी बँकेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये वाढत चाललेल्या थकबाकीला ब्रेक लावण्यासाठी ऑक्टोबर २०२२ पासून ओटीएस योजना जाहीर केली.
ती येत्या जून महिन्यापर्यंत सुरू असल्याचे बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी सांगितले. ओटीएस योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याजात सवलत दिली जात आहे.
चर्चेचे परिणाम
लोकसभा व नंतरच्या विधानसभा निवडणुकीअगोदर व नंतर कर्जमाफीची सतत चर्चा सुरू आहे. दरवर्षी कर्ज भरून बँकेत पत तयार केलेले शेतकरीही कर्जमाफीची अपेक्षा करून पैसे भरले नसल्याने थकबाकीत वाढ होत गेली.
जिल्ह्यातील ओटीएसची आकडेवारी
तालुका | पात्र | सहभागी | सवलत घेतलेले |
अक्कलकोट | ४,५९३ | १,३०५ | ४४० |
बार्शी | ३,२४५ | १,०७५ | ३०६ |
करमाळा | ४,७३२ | ८८७ | २०९ |
माढा | ३,८९७ | १,१२८ | २७५ |
माळशिरस | १,३७० | ३६७ | ७३ |
मंगळवेढा | २,००२ | १६९ | ३९ |
मोहोळ | १,६९१ | ४९९ | १२४ |
पंढरपूर | २,४८५ | ८८० | २३८ |
सांगोला | ८७६ | ७५ | २० |
द. सोलापूर | २,४७८ | ७१२ | २९७ |
उ. सोलापूर | ७५० | २५० | ४८ |
एकूण | २८,०३९ | ७,३४७ | १,९६६ |
जिल्हात ओटीएस योजनेसाठी पात्र २८ हजार ३९ शेतकरी पात्र आहेत. त्यातील ७, ३४७ शेतकऱ्यांनी ओटीएस योजनेत सहभाग घेतला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना सहभाग होऊन व्याजात सवलत घेता येते. शिवाय ओटीएस योजनेत पैसे भरल्यास नवीन कर्ज दिले जाणार आहे. येत्या ३० जून पर्यंत शेतकऱ्यांनी सवलतीचा फायदा घ्यावा. - कुंदन भोळे, प्रशासक, डीसीसी बँक
अधिक वाचा: दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर