जयेश निरपळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांना निसर्गाच्या 'अस्मानी-सुलतानी' संकटाने मोठा तडाखा दिला आहे. गेल्या महिनाभरात तीन वेळा आणि अवघ्या आठ दिवसांत दोनदा झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मात्र, या नैसर्गिक आपत्तीला पंधरा दिवस उलटूनही महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.
आनंद आणि उत्साहाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला (१८ मार्च) तालुक्यात काढणीला आलेल्या पिकांना गारपिटीने झोडपून काढले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, १९ मार्च रोजी पुन्हा सोसाट्याचा वारा आणि गारपीट झाल्याने मका, ज्वारी, बाजरी आणि गहू यांसारखी पिके जमीनदोस्त झाली.
सणासुदीच्या काळात पदरात पडणारे 'पांढरे सोने' आणि रब्बीचे पीक डोळ्यांदेखत मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यात गहू, मका, हरभरा आणि फळपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अशात अवकाळी पावसामुळे पिके आडवी पडल्याने काढणीसाठी मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. आधीच उत्पादनात घट आणि त्यात वाढीव मजुरीचा खर्च, अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे.
विविध पक्ष आणि संघटनांनी पंचनाम्यांची मागणी केल्यानंतर प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली, मात्र अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. नेमकी किती मदत मिळणार, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.
नुकसानीचे पंचनामे क्षेत्रीय पातळीवर सुरू - प्रशासन
या दिरंगाईबाबत तालुका प्रशासनाशी संपर्क साधला असता, महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी क्षेत्रीय पातळीवर काम करत असल्याचे सांगण्यात आले. लवकरच नुकसानीचा अंतिम आकडा जाहीर करून वरिष्ठ पातळीवर नुकसानभरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस आणि कांदा, हरभरा व फळपिकांचे गहू, क अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे पूर्ण करून सर्व बाधितांना न्याय द्यावा; अन्यथा शेतकऱ्यांचा संयम सुटू शकतो. - मनोज पाटील, शेतकरी, गंगापूर.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
