नागपूर :पीक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) मोठा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर ही योजना बंद होईल, अशी चर्चा रंगली होती. परंतु, एक रुपयातील पीक विमा योजना बंद होणार नसून, याच्या निकषात काही सुधारणा होतील, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Agriculture Minister Manikrao Kokate) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
केंद्र सरकारकडून (Central government) शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती. परंतु, ही योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांच्या हिताची असल्याची टीका झाली. त्यानंतर राज्य शासनाने नवीन पीक विमा योजना आणली.
प्रायोगिक तत्त्वावर बीड (Beed) जिल्ह्यात याचा प्रयोग केल्यानंतर राज्यभरही योजना राबविण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून ही योजना राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना (Farmers) पीक विम्यासाठी फक्त एक रुपया भरावा लागत आहे. इतर रक्कम शासनाकडून भरण्यात येते. परंतु, या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचे समोर आले. बोगस (Bogus) शेतकऱ्यांच्या नावे पीक विमा काढण्यात आला.
राज्यभर हा प्रकार घडला. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु, ही योजना बंद होणार नसल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले. बोगस विमा काढण्यात आला असून, कुणालाही रक्कम देण्यात आली नाही.
संबंधित सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली. ही योजना बंद होणार नसून, यात काही सुधारणा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
घोटाळ्याबाबत माहिती नसल्याचे केले स्पष्ट
एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात कृषी विभागात झालेल्या घोटाळ्याबाबत कृषिमंत्री कोकाटे यांना याबाबत विचारले असता याविषयाची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.