सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
तर उर्वरित रक्कम देखील दोन ते तीन दिवसांत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानसभेत दिली.
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, शेतकरी हा अन्नदाता आहे. नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे असल्याचे सांगून श्री. जाधव पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यास एनडीआरएफच्या निकषांपेक्षा कमी मदत दिली जाणार नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे पंचनामे होऊन याबाबतचा अहवाल प्राप्त होताच बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाते.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर, लोणार, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यात ६५ मिमीहून अधिक पाऊस झाल्याने ५० हजार ३९७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस, मूग, भाजीपाला यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बाधित शेती आणि घरांच्या नुकसानीची तातडीने पंचनाम्याचे काम सुरू केले असून याचा अहवाल प्राप्त होताच एनडीआरएफच्या निकषानुसार मदत वितरित केली जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?