कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये 'ओंकार' या हत्तीने धुमाकूळ घातला आहे. तांबोसे (गोवा) येथून आलेल्या या हत्तीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, भातशेती आणि बागायती पिके धोक्यात आली आहेत.
या हत्तीचा त्वरित बंदोबस्त न केल्यास २१ ऑक्टोबरपासून शेतात बसून आंदोलन करण्याचा इशारा या तीनही गावांमधील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
स्थानिक ग्रामस्थ तसेच मडुरा, कास आणि सातोसे येथील सरपंचांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षकांना शुक्रवारी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, 'ओंकार' हत्ती २७सप्टेंबरपासून कास, मडुरा आणि सातोसे गावांमध्ये फिरत आहे.
या हत्तीने भातशेती तसेच नारळ, पोफळी आणि केळीच्या बागायतींचे मोठे नुकसान केले आहे. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच हत्तीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका
वन विभागाच्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या कास, मडुरा आणि सातोसे येथील शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील चार दिवसांत हत्तीचा बंदोबस्त न झाल्यास मंगळवार, २१ ऑक्टोबरपासून शेतकरी शेतात बसून अनोखे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी वन विभागावर राहील, असे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सातत्याने आश्वासने
• वन विभागाने कास माउली मंदिरात दोन दिवसांत हत्तीचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले होते.
• त्यानंतर हत्ती पकडण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला आणखी आश्वासन दिले.
• मात्र, दोन आठवडे उलटूनही हत्तीपकड मोहिमेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वनरक्षक केवळ फटाके फोडण्याचे काम करत आहेत, असेही ग्रामस्थांनी वन विभागावर आरोप केले आहेत.
२० दिवसांपासून हत्ती ठाण मांडून
मडुरा पंचक्रोशीत मागील २० दिवसांपासून हत्ती ठाण मांडून आहे. तो आता राजरोसपणे शेती, बागायतीमध्ये फिरत आहे. बागायतदारांच्या केळी, माड बागायतीचे नुकसान करत आहे. भातशेती तुडवून जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. भातकापणीचा हंगाम सुरू असतानाही या भागातील शेतकरी भातकापणी करणार कसा ? त्याच्या मागे हत्तींचा ससेमिरा आहे. त्यामुळे तातडीने ओंकारला ताब्यात घेण्याशिवाय पर्याय नाही.
तातडीने नुकसान भरपाई द्यावी
ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने पीक नुकसान भरपाई मिळावी. स्थानिक प्रशासनाने मोबाइल कैंप सुरू करून अर्ज प्रक्रिया सुलभ करावी. तसेच शेतकऱ्यांमध्ये भीती कमी करण्यासाठी वन व सामाजिक कार्यकर्त्यांनी संवाद व मार्गदर्शन सत्रे घ्यावीत. हे उपाय अल्पकालीन असले तरी हत्तींच्या उपद्रवग्रस्त भागांतील शेतकऱ्यांचे जीवित आणि शेतीचे नुकसान कमी करण्यास मोठी मदत करू शकतात, अशी मागणी केली जात आहे.
