Join us

नगर जिल्ह्यात ऊस भावासाठी कारखान्यांत लागली स्पर्धा; शेतकऱ्यांचा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:39 IST

Sugarcane FRP 2024-25 २०२४-२५ च्या हंगामात गौरी शुगरने युनिट (हिरडगाव) ५ लाख ५५ हजार, तर नागवडे साखर कारखान्याने ३ लाख ९७ हजारांचा ९३० टन ऊस गाळप केला आहे.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : २०२४-२५ च्या हंगामात गौरी शुगरने युनिट (हिरडगाव) ५ लाख ५५ हजार, तर नागवडे साखर कारखान्याने ३ लाख ९७ हजारांचा ९३० टन ऊस गाळप केला आहे.

नागवडे कारखान्याने प्रतिटन ३ हजार ५० रुपये जाहीर करून ऊस भावात आघाडी घेतली. गौरी शुगरनेही प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा भाव जाहीर केला असून, साडेपाच लाख ऊस गाळप करून गौरी शुगरने गाळपात आघाडी घेतली आहे.

श्रीगोंदा हा लिंबाचा आंबटपणा आणि उसाची गोडी निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचा तालुका मानला जात होता. अलीकडच्या काळात बदलते हवामान आणि मधमाशांचे घटलेले प्रमाण यामुळे लिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे परिणामी बागा कमी झाल्या आहेत.

पाणीटंचाई आणि भाव देताना साखर कारखान्यांची नकारात्मकता यामुळे उसाचे मळे कमी झाले आहेत. गौरी शुगरची गेल्या गाळप हंगामापासून श्रीगोंद्याच्या साखर क्षेत्रात एंट्री झाली. पहिल्या वर्षी प्रतिटन ३ हजार ६ रुपये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात नंबर एकचा भाव दिला.

यावर्षीच्या गाळपात नागवडे साखर कारखाना विधानसभा निवडणुकीमुळे १५ दिवस उशिरा सुरू झाला. गौरी शुगरने हिरडगाव युनिट लवकर सुरू केले. देवदैठणचे युनिट उशिरा सुरू केले.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सुरुवातीला २ हजार ९०० रुपये भाव जाहीर केला. त्यावर गौरी शुगरचे बाबूराव बोत्रे पाटील यांनी ३ हजार १० रुपयांचा भाव जाहीर केला.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखाना पूर्णक्षमतेने चालावा यासाठी ३ हजार ५० रूपये प्रतिटन भाव जाहीर करून 'मास्टर स्ट्रोक' मारला आहे. यातून शेतकऱ्यांना ऊस शेतीची पुन्हा गोडी लागण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील बारमाही बागायत शेतकरीही केवळ ऊस न घेता आता हंगामी पिकेही घेऊ लागली आहेत. यामध्ये कपाशी, कांदा या पिकाचे क्षेत्र काही प्रमाणात वाढत आहे.

२६ हजार हेक्टरवर श्रीगोंदा तालुक्यात उसाची लागवड झालेली आहे. त्यात १३ हजार ८१७ हेक्टरवर नवीन ऊस लागवड आहे.

पुणे जिल्ह्यातील कारखान्यांपुढे आव्हानपुणे जिल्ह्यातील कारखाने जादा भाव देतात म्हणून शेतकरी त्या साखर कारखान्यांना ऊस कसा देता येईल यासाठी धडपड करीत होते. मात्र, गौरी शुगरने ऊस भावात सकारात्मकता आणि नागवडेंनी भावात आक्रमकता आणली. यामुळे पुणेकरांपुढे ऊस भावाचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात जाणारा ऊस आता श्रीगोंद्यातील कारखान्यांनाच मिळत आहे.

खासगी साखर कारखान्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन जादा भाव देण्याचे धोरण घेतले आहे. - राजेंद्र नागवडे, अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना

गौरी शुगरने उसाला कायमस्वरूपी अधिक भाव कसा देता येईल असे धोरण घेतले आहे. यापुढेही गौरी शुगर ऊस भावात आपले कर्तव्य बजावेल. - बाबूराव बोत्रे पाटील, अध्यक्ष ओंकार ग्रुप, पुणे

टॅग्स :साखर कारखानेऊसअहिल्यानगरपुणेशेतकरीशेतीपीकश्रीगोंदालागवड, मशागत