सोलापूर : खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार ४२१ शेतकऱ्यांसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये नव्याने मंजूर झाले असून, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यातील १६ लाख २५ हजार ८३१ शेतकऱ्यांसाठी १६०७ कोटी मंजूर झाले आहेत.
यंदा मे महिन्यात पडलेल्या अवेळी पावसानेही शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ही झाली आहे.
जून महिन्यापासून नवीन हंगामाला सुरुवात होते. या हंगामात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाचही मंडलात तसेच दक्षिण तालुक्यातील दोन व अक्कलकोट तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली होती.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने पिके तर गेलीच शिवाय जमिनीही खरडून गेली. जमीन खरडून गेल्याने झालेल्या नुकसानीची २० हजार ४२१ शेतकऱ्यांना १२ हजार ४६० हेक्टरसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
माळशिरस तालुका वगळता जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम आहे. आता नदीकाठावरील जमीन खरडून गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पीक नुकसान भरपाई मदतीचे चार आदेश निघाले आहेत. पहिला आदेश १८ ऑक्टोबर, दुसरा आदेश २० ऑक्टोबर, तिसरा आदेश ४ नोव्हेंबर तर चौथा आदेश ७ डिसेंबर रोजी निघाला आहे.
अशा झाल्या मंजूर रकमा ऑगस्ट महिन्यातील पीक नुकसानीचे ५९ हजार ११० शेतकऱ्यांना ५९ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीच्या पहिल्या आदेशात ६ लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांना ७७२ कोटी ३६ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले. याच महिन्यातील नुकसानीसाठी तिसऱ्या आदेशानुसार ८५ हजार ५८१ शेतकऱ्यांना ९५ कोटी १ लाख रुपये मंजूर झाले.
तर याच महिन्यात जमीन खरडून वाहून गेलेल्या २० हजार ४२१ शेतकऱ्यांसाठी ५७ कोटी ५९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय बियाणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी ७लाख ८२ हजार १२७ शेतकऱ्यांसाठी ६५२ कोटी ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले.
बियाणासाठी ६ लाख शेतकऱ्यांना ६५२.७ कोटी
◼️ बियाणे खरेदीसाठी मंजूर ७ लाख ८२ हजार शेतकऱ्यांपैकी ६ लाख शेतकऱ्यांना मंजूर ६५२ कोटी ७ लाख रुपयांपैकी ५२१ कोटी ३६ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
◼️ ऑगस्ट महिन्यातील तसेच २ खरडलेल्या जमिनीची रक्कम वगळून आतापर्यंत १२०४ कोटी ६७ लाख रुपये ११ लाख ६६ हजार ५७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत
सप्टेंबरमध्ये ६८३.३१ कोटी खात्यावर जमा
सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे ७ लाख ६४ शेतकऱ्यांपैकी ५ लाख ६७हजार २६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर ८६७ कोटी ३८ लाख रुपयांपैकी ६८३ कोटी ३१ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
अधिक वाचा: ऊस तोडणी व ओढणीने शेतकऱ्याला दिला झटका; प्रतिटनाला बसतोय शंभर रुपयांचा फटका
