करमाळा : निर्यातक्षम केळीच्या दरात सुधारणा होत असताना थंडी अचानक वाढल्याने केळीवर चिलिंगचा प्रादुर्भाव वाढला आहे.
त्यामुळे केळीची वाढ खुंटली अन हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
चिलिंगग्रस्त केळीच्या खरेदीवेळी व्यापाऱ्यांकडून चिलिंग व बिगर-चिलिंग मालामध्ये फरक केला जात आहे. चिलिंगचा प्रादुर्भाव झालेला माल प्रतिकिलो पाच ते सहा रुपयांनी कमी दराने खरेदी केला जात आहे.
त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
विम्यासाठी अपात्रच
◼️ अपेक्षेप्रमाणे दरवाढ झालीही; मात्र केळीवर चिलिंग आल्यामुळे व्यापारी कमी भाव देत आहेत. वाढलेल्या खर्चात शेती करणे अवघड झाले आहे.
◼️ हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून केळीचा विमा काढण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे; मात्र त्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम भरावी लागत आहे.
◼️ शिवाय विमा घेतल्यानंतरही कंपन्यांच्या जाचक अटींमुळे नुकसान होऊनसुद्धा बागा विम्यासाठी पात्र ठरत नाहीत.
तापमान घटल्याने केळीफूल निसवा प्रक्रिया मंदावली
◼️ तापमानात अचानक घट झाल्याने केळीफूल निसवा प्रक्रिया मंदावली असून झाडातील रसवाहिन्या आकुंचन पावत आहेत.
◼️ परिणामी घडातील फण्या अपेक्षित प्रमाणात बाहेर पडत नाहीत.
◼️ निसवा प्रक्रिया मंदावल्याने फळांची लांबी व जाडी कमी होण्याचा धोका वाढला आहे.
◼️ थंडीची झळ बसल्याने पानांची वाढ खुंटते, पानांची टोके सुकतात.
◼️ बागांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
◼️ तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास केळीची वाढ पूर्णतः थांबत आहे.
काय कराल उपाय?
◼️ केळफूल आणि शेवटची फणी काढल्यानंतर, घडावर २ टक्के सच्छिद्रता असलेल्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर करावा.
◼️ तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास, पहाटे बागेच्या कडेला ओला काडीकचरा, पालापाचोळा, किंवा लाकडाचा भुसा जाळून धूर करावा.
◼️ जमिनीतील ओलावा कमी पडू देऊ नका.
◼️ ठिबक सिंचनाचा वापर करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवा, जेणेकरून मातीची उष्णता टिकून राहील.
◼️ बागेच्या भोवती वारा अडवणारी कुंपण असावे.
संजय वाकडे, उपविभागीय कृषी
अधिकारी, कुर्डूवाडी
अधिक वाचा: ढगाळ वातावरणात कीड व रोगांपासून कसे कराल आंबा पिकाचे संरक्षण? वाचा सविस्तर
