तासगाव : शेती औषधाचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले जी-२ प्रमाणपत्र नोंदणी न करता, कंपनीस कोणताही परवाना नसताना द्राक्ष बागेसाठी लागणारी उत्पादने बेकायदेशीर तयार करून विक्री केल्याप्रकरणी एस के अॅग्रो सायन्स या बोगस पीजीआर कंपनीवर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
खुजगाव (ता. तासगाव) येथील शेतकरी रवींद्र देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांनी तासगाव पोलिसात याबाबत फिर्याद दिली.
द्राक्ष बागायतदार रवींद्र देशमुख यांनी ग्रेप मास्टर या पीक संजीवकाबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली होती. सातत्याने देशमुख यांनी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने संबंधित औषध कंपनीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे या कंपनीबाबत माहिती मागवली. मात्र, या कंपनीचा पत्ता पुणे येथील असल्याचे निदर्शनास आले.
'लोकमत'च्या मालिकेवर शिक्कामोर्तब 'पीजीआरचा फंडा, शेतकऱ्यांना गंडा' अशी वृत्त मालिका 'लोकमत'मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. या मालिकेतून बोगस पीजीआर कंपन्या आणि त्यांच्या औषधांचा भांडाफोड करण्यात आला. कृषी विभागाने चौकशी करून तासगाव पोलिसात बोगस पीजीआर कंपनीवर गुन्हा दाखल केला. त्यामुळे 'लोकमत'च्या मालिकेवर शिक्कामोर्तब केले आहे.
'पीजीआर' बोगसगिरीला प्रशासनाचे खतपाणी कोणताही परवाना नसताना पुणे, मुंबईचा पत्ता टाकायचा. गल्लीबोळात औषधांची निर्मिती करायची आणि राजरोसपणे कृषी सेवा केंद्रातून बोगस पीजीआर औषधांची विक्री करायची. ही बोगसगिरी अधिकाऱ्यांनाही माहीत आहे. मलईच्या हव्यासातून या बोगसगिरीला खतपाणी घालण्याचे काम दिसून येत आहे.
पुण्यात कंपनीचा पत्ता नाही १) कृषी विभागाच्या चौकशीनंतर एस के अॅग्रो सायन्स या कंपनीने कोणताही परवाना नसताना द्राक्ष बागेसाठी लागणारी उत्पादने बेकायदेशीर तयार केली. त्या उत्पादनांचा विक्री साठा, वाहतूक, तसेच एस के अॅग्रो सायन्स ही कंपनी दिलेल्या कंपनीच्या पत्त्यावर आढळून आली नाही. २) संबंधित कंपनीविरोधात तसेच अज्ञात इसमाविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ मधील ७, अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील ३ (२) (डी), खत नियंत्रण आदेश १९८५ मधील १९ (सी) (iv) उल्लंघन केल्याप्रकरणी, तालुका कृषी अधिकारी फोंडे यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. ३) कंपनीच्या नोंदणीबाबत माहिती घेण्यात आली. एस के अॅग्रो सायन्स या कंपनीला उत्पादन निर्मितीसाठीचा जी २ नोंदणी प्रमाणपत्र दिले नसल्याची माहिती मिळाली. पुणे येथील कृषी विभागाशी संपर्क साधून माहिती घेण्यात आली. तर औषधावर असलेला पत्त्याच्या ठिकाणी कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बोगस 'पीजीआर'च्या औषधांसाठी कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती सुरू