Join us

एफआरपीपेक्षा जादा भाव देण्यात राज्यात अग्रेसर असणाऱ्या सोमेश्वर कारखान्याचे मोठे यश; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:00 IST

someshwar sakhar karkhana बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तीन पुरस्कार पटकावले आहेत.

पुणे/सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तीन पुरस्कार पटकावले आहेत.

पुणे मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट दरवर्षी राज्यातील जवळपास २०० खासगी व सहकारी साखर कारखान्यामध्ये हे पुरस्कार जाहीर करत असते. यावर्षी यामध्ये बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने दोन सांघिक व एक वैयक्तिक पुरस्कार मिळवले आहेत.

उत्कृष्ट व्यवस्थापनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर तांत्रिक कार्यक्षमताचा तिसरा, असे दोन सांघिक पुरस्कार मिळाले असून कारखान्याचे योगिराज नांदखिले यांना उत्कृष्ट फायनान्स मॅनेजरचा वैयक्तिक पुरस्कार मिळाला आहे.

सोमेश्वर कारखाना गेली अनेक वर्षे एफआरपीपेक्षा जादा भाव देण्यात राज्यात अग्रेसर आहे, तसेच विविध प्रकल्प उभारतानाही कर्जफेडीबाबत कसलीही थकबाकी नसणे, अनियमित कर्जाची उभारणी न करणे, तारण कर्जावर अत्यंत कमी म्हणजे केवळ ६५ रुपये व्याज खर्च करणे, नक्त मूल्यात वाढ आदी कारणांनी सोमेश्वर कारखान्याला राज्यातील सर्वोच्च आर्थिक क्षमतेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तर शून्य स्टॉपेजेस, बगॅस बचत सव्वासात टक्के, साखर उतारा सलग सात वर्षे मध्य महाराष्ट्रात उच्चांकी, देखभाल दुरुस्ती खर्च केवळ ८८ रुपये प्रतिटन व गाळप क्षमतेचा वापर १०६ टक्के यामुळे सोमेश्वर कारखान्याला मध्य महाराष्ट्रातला तांत्रिक व्यवस्थापनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

तर वैयक्तिक स्वरूपातील राज्यातील सर्वोत्कृष्ट फायनान्स मॅनेजर हा पुरस्कार मुख्य लेखापाल योगिराज सुरसिंगराव नांदखिले यांना मिळाला असून, कारखान्याची चोख आर्थिक आर्थिक व्यवस्थापन करणे, उसाची बिले वेळेवर करणे, नफा निर्देशांक चांगला राखणे आदी बाबतीत सरस कामगिरी केल्याने हा पुरस्कार मिळाला आहे.

गतवर्षी सोमेश्वरला बेस्ट एमडी पुरस्कार राजेंद्र यादव यांना मिळाला होता. यावर्षी बेस्ट फायनान्स मॅनेजर पुरस्कार मिळाल्यामुळे कारखान्याच्या गुणवत्तेतर शिक्कामोर्तब झाली आहे.

अजितदादांचे मार्गदर्शन संचालक मंडळ व सभासदांची साथ कामगार अधिकारी वाहतूकदार व तोडणी कामगार यांच्या कष्टामुळे हा पुरस्कार मिळाला असल्याच्या भावना पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब कामठे व राजेंद्र यादव यांनी व्यक्त केल्या आहेत.

वीजनिर्मितीगेल्या वर्षी देखील सोमेश्वर कारखान्याला उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार मिळाला होता. तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना उत्कृष्ट कार्यकारी पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. कारखान्याने दुप्पट विजेचे उत्पादन सुरू केले असून १८ मॅगावेंट सहवीजनिर्मिती प्रकल्प आता ३६ मॅगावॅटने विजेची निर्मिती सुरू आहे. साखर कारखान्याचे सद्या ६ लाख १ हजार मेट्रिक टन ऊत्साचे गाळप केले असून ६ लाख ८१ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

अधिक वाचा: उसाचे पाचट कुजविण्याचा कोल्हापुरी पॅटर्न; २८६ कृषी सहायक शेतकऱ्यांच्या बांधावर

टॅग्स :साखर कारखानेऊसपुणेशेतकरीबाजारमहाराष्ट्र