फळबाग योजनेतून गडचिरोली जिल्ह्यात मागील हंगामात अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. ज्यात कृषीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्यात आली. दरम्यान या शासकीय योजनेतून पाच ते सहा वर्षापूर्वी लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या हातात आता आंब्याचे उत्पादन येऊ लागले आहे.
सध्या बाजारात आंब्याला चांगला दर असून आंब्यांच्या विक्रीतून बळीराजा शेतकरी मालामाल होत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकाचेच अधिक क्षेत्र पीक लागवडीखाली असते. याशिवाय कापूस, सोयाबीन, बांधावर तुरींची लागवड शेतकरी करतात. तसेच रब्बी हंगामात कडधान्य पिकांसह हरभरा, मका व तेलवर्गीय पिकांची लागवड शेतकरी करतात.
मात्र ही पिके हंगामी आहेत. तर जिल्ह्यात फळपीक लागवडीसाठी योग्य वातावरण असून पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ मिळत असल्याने आता अनेक शेतकरी फळबागेकडे वळले आहे.
शेतकऱ्यांनी केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता बांधावर फळरोपट्यांची लागवड करून अधिक उत्पादन घ्यावे. कृषी विभागातर्फे कार्यशाळांच्या माध्यमातून प्रशिक्षण, मार्गदर्शन केले जाते. याचा लाभ घ्यावा. - बाळकृष्ण सडमाके, आंबा उत्पादक, कासवी.
फळबाग योजनेतून १०५६.८६ हेक्टरवर आंबा
१०५६.८६ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे. यात आंबा, फणस, लिंबूसह विविध फळझाडांच्या रोपट्यांचा समावेश आहे. फळबाग लागवडीची टक्केवारी १५०.९८ टक्के आहे. एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक २०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आलेली आहे.
कोणत्या तालुक्यात किती ? (हेक्टर) फळबाग
तालुका | आंबा क्षेत्र |
गडचिरोली | ६४.२७ |
धानोरा | ७९.८२ |
चामोर्शी | ७५.०० |
मुलचेरा | ७५.०२ |
देसाईगंज | ७०.२३ |
आरमोरी | ६४.८५ |
कुरखेडा | १३५.९४ |
कोरची | २८.०० |
अहेरी | ८५.६० |
एटापल्ली | २०० |
भामरागड | ८९.८० |
सिरोंचा | ८८.३३ |