पश्चिम आशियातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नसून, त्याचा परिणाम जागतिक स्तरावर होत आहे. विशेषतः इंधन टंचाईने सारेच चिंताग्रस्त झाले आहेत. शेजारच्या श्रीलंकेसारख्या देशात कडक 'रेशनिंग' सुरू झाले असून, आठवड्यातील एक दिवस शाळा, कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
आपल्याकडे अजून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी, पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या व गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. इंधन वितरणात काही 'मर्यादा' ही घातल्या गेल्या आहेत.
अशात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगात व चावडीपाडा या ३ पाड्यांतील ३०० कुटुंबांनी एकत्र येत गॅस टंचाईला सामोरे जाताना आपला खारीचा वाटा म्हणून येत्या सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर बंद करून पारंपरिक गोवऱ्या व जंगलातील वाळलेला लाकूडफाटा या नैसर्गिक संसाधनांनी चुलीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात नैसर्गिक साधनांची उपलब्धता असल्याने 'प्रासंगिक पर्याय' म्हणून या प्रयोगाकडे आशेने पाहता यावे. टंचाई निवारणात पूर्णाशाने नव्हे, पण अल्पशी का होईना मदत याद्वारे घडून येणारी आहे.
सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी, कोल्हापूरची शेळके वाडी, अहिल्यानगर जिल्ह्याचे राळेगणसिद्धी व हिवरेबाजार, धाराशिवच्या शिराढोण, रांझणी आदी गावांनी सौरऊर्जा व बायोगॅसचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प साकारून नव-नवे आदर्श निर्माण केले आहेत.
याच मालिकेत बारीपाडासह तीन पाड्यांनी 'गॅसमुक्ती 'चा निर्णय घेतला आहे. तब्बल ८० लाख वृक्षांच्या लागवडीची मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पद्मश्री चैत्राम पवार यांच्या पुढाकारातून हा 'गॅसमुक्ती'चा बारीपाडा पॅटर्न आकारास आला आहे. ही आजच्या समस्येवरील केवळ तात्पुरती सोय नसून, इंधन बचत व स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.
पूरक पर्याय कोणते ?
भारताला लागणाऱ्या इंधनातील मोठा हिस्सा आयात करावा लागतो. यातील अर्थकारण व अवलंबित्व टाळण्यासाठी इथेनॉल, डायमिथाईल इथर (डीएमई), बायो डिझेल असे काही पूरक पर्याय हाताळता येणारे आहेत. याचसोबत शक्य असेल तेथे पारंपरिकपणे वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचाही वापर करून टंचाईशी सामना करता येणार आहे.
नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री...
• स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसऐवजी नैसर्गिक इंधन वापरल्याने कंपन्यांवरील अवलंबित्व संपुष्टात येऊन स्वयंपूर्णता किंवा आत्मनिर्भरता साधता येऊ शकते.
• एलपीजी हे जीवाश्म इंधन BHAVE BIRT PHONE वाहतुकीतून पर्यावरणाचे काही प्रश्न निर्माण होतात. याउलट नैसर्गिक इंधनातून कार्बन संतुलन राखणे शक्य असते.
• गॅस सिलिंडरची उपलब्धता व त्यासाठीचा खर्च पाहता नैसर्गिक इंधन उपलब्धता व खर्च तुलनेने शून्य आहे.
देशहितासाठी आपण संयम पाळला व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केला, तर कोणतीही कठीण परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही. - चैत्राम पवार, बारीपाडा.
किती बचत ?
बारीपाडा येथे १२०, मोहगाव, चावडीपाड्यात ८५ गॅस कनेक्शन्स आहेत. तिन्ही पाड्यांत महिन्याला १५० सिलिंडर लागतात. या हिशेबाने सहा महिन्यांत २०० सिलिंडर वाचतील, असा अंदाज आहे.
किरण अग्रवाल
कार्यकारी संपादक, जळगाव.
हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर
